
सार्वजनिक बांधकाम विभाग ठेकेदारावर मेहेरबान, दिरंगाईसाठी पालिकेकडे बोट दाखवून ठेकेदाराची पाठराखण...
अमळनेर – शहरातील जाणारा जांभोरा ते मांडळ प्रमुख जिल्हा मार्गावर शहरातील हद्दीत ढेकू रोड कॉंक्रिटीकरण करण्याच्या कामासाठी अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागाने ११ मार्च २०२४ रोजी ०२ कोटी ३२ लाख ३५हजार २२० रुपये किमतीचा कार्यारंभ आदेश शहरातील श्रेया कन्स्ट्रक्शनला देण्यात आलेला असताना देखील ठेकेदाराला दोन वर्ष होऊन देखील प्रत्यक्षात मात्र रस्ता कॉंक्रिटीकरणाच्या कामाला मुहूर्त मिळाला नसल्याचे आज रोजी चित्र आहे. त्यामुळे परिसरातील १० हजार स्थानिक नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने ते चांगलेच हैराण झाले आहेत.

ढेकू रोड परिसरात १६ महिन्यापूर्वीच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून भूमिगत गटारीसाठी पाइपलाइन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यासाठी डांबरी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. मात्र गटारीचे काम पाच महिने पूर्णतः रस्ता बंद करून अतिशय संथगतीने करून तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकल्यामुळे ढेकूरोडवासीयांचा यंदाचा पावसाळा चिखलाचा सामना करण्यात गेला. त्यानंतर रस्त्यावर एमपीएमचे निकृष्ट काम करण्यात आले. त्यामुळे खडी सहज निघत असल्याने काही दिवसातच खड्डे पडायला लागलेत. या खड्ड्यात रोज किरकोळ अपघात घडत असून, वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे वाहन चालवणे जिकरीचे झाले आहे. त्यातच टायर फुटणे,पंक्चर होणे, धुळीचा व पाठीचा त्रास जाणवणे असे प्रकार घडत आहे. तसेच आबालवृद्धांना ये -जा करणे अवघड झाले आहे. बरेचदा पायी चालत असताना खडी वरून घसरून अपघात घडत जखमी होण्याच्या घटनाही घडल्या आहेत.
मात्र गेल्या काही महिन्यापूर्वीच नव्याने कार्यभार घेतलेल्या सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंतांनी या रस्त्या कामाच्या संदर्भात पालिकेच्या मुख्याधिकारी
यांना २६ फेब्रुवारी २०२६ रोजी दोन वर्षात एकमेव पत्र दिले आहे. हे विशेष! यावरून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते आपल्या यंत्रणेच्या अखत्यारित येत असलेल्या या रस्त्याच्या कामाकडे दोन वर्षापासून डोळेझाक करून ठेकेदाराला अभय देत असल्याचे स्पष्ट होते. तसेच या पत्रात नमूद केलेले भुयारी गटार योजनेचे काम हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने केलेले असून ढेकू रोडवरील भुयारी गटार योजनेचे काम १६ महिन्यापूर्वीच अंदाजपत्रकाप्रमाणे पूर्ण झालेले असून सदरचा रस्ता वाहतुकीसाठी नागरिकांना खुला करून दिल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता आर.डी.सूर्यवंशी यांनी सांगितले.
शहरातील मुख्य रस्ता असल्याने या रस्त्याने दहा ते बारा गावांची नियमित वाहतूक तसेच धुळे जिल्ह्याकडून अनेक वाहने याच रस्त्याने येतात जातात. त्यामुळे वाहनांची मोठी वर्दळ असते. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी हा रस्ता कॉंक्रिटीकरण करण्याबाबत संबंधित विभागाकडे तक्रारी देखील केल्या असल्याचे सांगण्यात येते.या कामाबाबत ठेकेदारांने सार्वजनिक बांधकाम विभागाचा काम करण्याचा बारा महिने कालावधीची मर्यादा देखील ओलांडली असल्यामुळे ठेकेदार व संबंधित बेजबाबदारपणे आपल्या कामात दिरंगाई करून जनतेस वेठीस धरणाऱ्या अभियंत्यांची प्रशासकीय चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. तसेच येत्या १० ते १५दिवसात रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात न झाल्यास रास्ता- रोको करण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
प्रतिक्रिया
सार्वजनिक बांधकाम विभागाचे ढेकूरोड संदर्भातील दि.२६/०२/२०२६ रोजीचे पत्र कार्यालयास प्राप्त झालेले असून पत्रात नमूद भुयारी गटार योजनेचे काम १६ महिन्यांपूर्वीच एमजेपीने संबंधित ठेकेदाराकडून पूर्ण करून घेतलेले आहे. शहरात सध्या नवीन २४×७ पाणीपुरवठा योजनेचे काम सर्वत्र सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांसह योजनेचे ठेकेदार व मी प्रत्यक्ष पाहणी करून सदर योजनेतील ढेकूरोडवरील पाइपलाइन क्रॉसिंगचे काम ठेकेदाराकडून त्वरित करून देण्यात येईल. जेणेकरून प्रलंबित रस्ता कॉंक्रिटीकरण करून नागरिकांना खुला करण्यास मदत होईल.
गणेश शिंदे, मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद
प्रतिक्रिया
सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाचा नुकताच कार्यभार घेतलेला असून ढेकूरोड काँक्रिटीकरण कामाच्या संदर्भात पालिकेशी पत्रव्यवहार केलेला असून प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित ठेकेदाराला त्वरित काम सुरू करण्यासाठी आदेशीत करण्यात येईल. तसेच काँक्रिटीकरणाचे करण्याचे काम सुरू झाल्यानंतर या रोडवरील वाहतूक पिंपळे व गलवाडे रोडने वळवण्याचे नियोजन देखील करण्यात येईल. जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही.
पी.ए.पाटील, अभियंता सा. बां. उपविभागीय, अमळनेर





