
अमळनेर: पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी पतीला अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने भगवान रामदास शिंपी वय ६० वर्ष रा. ताडेपुरा, पैलाड, अमळनेर,यांस ७ वर्षे सश्रम कारावास व २ हजार रू दंडाची शिक्षा सुनावली. भगवान रामदास शिंपी वय ६० रा ताडेपुरा असे आरोपीचे नाव आहे.

भगवान रामदास शिंपी रा ताडेपुरा हा व्यवसायाने रवी टेलर यांच्याकडे टेलरिंग काम करत होता. तो नेहमी पत्नी सुरेखाला मारत होता. त्याच्या पत्नीने रवी टेलर यांच्याकडे तक्रार केली होती की माझा पती मला मारतो. त्यावेळी रवी टेलरने तिला सांगितले की आजच्या दिवस जाऊ द्या उद्या त्याला समजाऊ मात्र त्याचदिवशी दि. १ नोव्हेंबर २०२३ रोजी सांयकाळी पत्नी सुरेखा मजुरीची कामे आटोपुन घरी गेली व ती घरी असतांना पती भगवान शिंपी हे घरी आला तेव्हा ती फोनवरुन तिची मुलगी रोशनी हिच्याशी फोनवर बोलत होती. तेव्हा भगवान तिला शिवीगाळ करुन तिच्या चारित्र्यावर संशय धरुन तिला मारुनच टाकतो असे म्हणुन शिविगाळ करत घराबाहेर निघुन गेला त्यानंतर रात्री ८ वाजता घरासमोर ओट्यावर बसलेली असतांना पती भगवान शिंपी हे घरी आला व तिला पाहुन शिविगाळ करत तिला चापटबुक्यांनी मारहाण करुन तिला खाली जमिनीवर आडवे पाडले व पॅन्टच्या खिशातून चाकु सारखे धारदार हत्यार काढुन तिच्या गळ्यावर जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार केले. तिच्या गळ्यावर मानेवर, हनूवटीवर व दोन्ही हातावर धारदार चाकुने वार केल्याने ती जखमी झाली होती. तिचा मुलगा गणेश घरी आला व गल्लीतील नाना चौधरी व इतर लोक जमा झाल्याने भगवान पळून गेला. सुरेखाला उपचारसाठी दाखल करून भगवान विरुद्ध पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत होते. आरोपीला अटक करण्यात आली होती तेव्हापासून तो कारागृहात होता.
सदरचा खटला अमळनेर येथील जिल्हा न्यायाधीश 1 व अति. सत्र न्यायाधीश सी. व्ही. पाटील यांचेपुढे चालला. त्यात सरकारी वकील अॅड, के. आर. बागुल मंगरूळकर यांनी एकूण ६ साक्षीदार तपासले. त्यातील फिर्यादी ही आरोपीची पत्नी होती. तिच्यावरच हमला झाल्याने स्वतः उपचार घेत असतांना तिने दिलेला जबाब न्यायालयात पती विरुध्द सागितला. त्याचप्रमाणे प्रत्यक्षदर्शी पाहणारे साक्षीदार रवि टेलर, ज्ञानेश्वर संतोष, पंच व डॉ. प्रकाश ताडे, अमळनेर ग्रामीण रुग्णालय यांची साक्ष महत्वाची ठरली फिर्यादीवर चाकूने झालेल्या जखमा मुळे तिला जिवे मारण्याचा उद्देश होता हे न्यायालयात सिध्द झाल्याने याबाबत सरकारी वकील के. आर. बागुल यांनी प्रभावी युक्तीवाद केला. त्याप्रमाणे आरोपीतास न्यायालयाने दोषी धरून भा.द.वी. कलम ३०७ प्रमाणे गुन्हा केल्याचे सिध्द झाल्याने त्यास ७ वर्ष सश्रम कारावास व २ हजार रू. दंड अश्याप्रकारची शिक्षा न्यायालयाने सुनावली. जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याबद्दल दोन वर्षे व दंड रक्कम रु १ हजार रुपये अशी शिक्षा सुनावली. सदरील कामकाजात पो.हे.कॉ. पुरुषोत्तम वाल्डे, केस वॉच व पैरवी अधिकारी, पी. एस. आय. उदयसिंग सांळुके पारोळा पो. स्टे पैरवी अधिकारी पो.कॉ राहुल रणधीर, चोपडा ग्रामीण, पो.स्टे. व पो.हे.कॉ. प्रमोद पाटील, चोपडा शहर पो.स्टे. पो.कॉ. सतीष भोई, अडावद पो.स्टे., व पो.कॉ. भरत इशी, मारवड पो.स्टे. यांनी सहकार्य केले.




