
गांजा सेवन करणाऱ्या तरुणांना रंगेहाथ पकडून केला गुन्हा दाखल…
अमळनेर : शहरात येणाऱ्या गांजाला बऱ्याच प्रमाणात प्रतिबंध घातला असला तरी अनेक तरुण गांजा सेवन करून उध्वस्त होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे राहुल गायकवाड व अमळनेर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी संयुक्त कारवाई करत चार वेगवेगळ्या ठिकाणी गांजा सेवन करणाऱ्या तरुणांना रंगेहाथ पकडून त्यांच्यावर एनडीपीएस कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर शहरात तरुण गांजा सेवनाकडे वळले असून भविष्यात गुन्हेगारीकडे वळतील त्यामुळे वेळीच आवर घालणे गरजेचे असल्याने एलसीबी व अमळनेर पोलीस स्टेशन यांनी संयुक्त मोहीम राबवली. मिळालेल्या गोपनीय माहितीवरून एलसीबी निरीक्षक राहुल गायकवाड यांनी त्यांचे कर्मचारी प्रवीण मांडोळे , संदीप पाटील , तर अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार , विनोद संदानशिव , नितीन मनोरे , उदय बोरसे ,निलेश मोरे ,उज्वल कुमार म्हस्के ,नितीन कापडणे याना ११ रोजी वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारायला पाठवले. मारवड रस्त्यावर उड्डाणपुलाच्या खाली राजेश चुडामन कोईकर वय २१ रा बंगाली फाईल हा तरुण चिलीम मध्ये गांजा भरून सेवन करताना आढळून आला. दुसरीकडे इंदिरा भवनच्या मागे मोकळ्या जागेत आदिल आबीद शेख वय २५ रा माळीवाडा बहादरपूर रोड हा देखील गांजा सेवन करताना आढळून आला. तिसऱ्या ठिकाणी रेल्वे स्टेशनच्या बाहेर पाण्याच्या टाकीजवळ निलेश महेंद्र पाटील वय २२ रा बंगाली फाईल हा चिलीम मध्ये गांजा सेवन करताना आढळून आला. तर नईमअली अशपाक अली वय २५ रा गांधलीपुरा हा तरुण इंदिराभवन च्या मागील बाजूस गांजा सेवन करताना आढळून आला. चारही तरुणांकडून चिलीम आणि गांजा जप्त करून त्यांच्यावर एनडीपीएस कायदा ८ क, २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या धाडसत्रामुळे गंजोड्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे शेतकी संघ जीन , बसस्टँड मागे , अंबाऋषी टेकडी ,चोपडा रोड उड्डाण पूल , दाजीबा नगर जवळील मैदान , आदी विविध ठिकाणी देखील काही तरुण गांजा सेवन करीत असल्याची ओरड आहे त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.




