
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील आर के फूड्स कंपनीच्या गहू खरेदीत शेतकऱ्यांच्या मालाच्या वजनात सुमारे ३६ टक्के तफावत आढळून आल्याने बाजारसमितीचे सभापती अशोक पाटील व वांधा समितीने तक्रारदार दोन शेतकऱ्यांना वाढीव ३६ टक्के मालाचा मोबदला मिळवून देत आर के फूड्स चे तीन वर्षांचे दप्तर ताब्यात घेऊन कंपनीविरुद्ध पोलिसात तक्रार देण्याचा निर्णय घेतला आहे. तर तांत्रिक दोष आढळून आल्याने वजनमाप निरीक्षकांनी देखील वजन काटा बंद करून दंडात्मक कारवाई केली आहे.

अमळनेर धुळे रस्त्यावर मंगरूळ येथे आर के फूड्स कंपनीत शेतकऱ्यांचा गहू विकत घेऊन त्यापासून आटा, पीठ ,रवा , मैदा, सुजी आदी पदार्थ बनवले जातात. मात्र १० रोजी दोन शेतकऱ्यांना आपल्या मालाच्या वजनात तफावत आढळल्याने त्यांनी बाजार समिती सभापती अशोक पाटील यांच्याकडे तक्रार केली होतील. सभापती तसेच बाजार समितीचे सचिव डॉ उन्मेष राठोड यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन तपासले असता त्यांना देखील वजनात प्रचंड तफावत आढळून आली. म्हणून त्यांनी तातडीने कंपनी सह वजन काट्याला सील लावले होते.
त्यांनतर हे प्रकरण बाजारसमितीच्या वांधा कमिटीपुढे ठेवून कंपनीचे मालक , शेतकरी याना समक्ष बोलावले. तिकडे वजन माप निरीक्षक कुमारसिंग राजपूत याना तक्रार करण्यात आली. वजनमाप निरीक्षक राजपूत यांनी कर्मचाऱ्यांसमक्ष सील उघडून काटा तपासला असता एक सेल ची वायर तुटलेली आढळली. आणि प्रत्यक्ष वजन करून पाहिले असता वजनात तफावत आढळून आली. त्यामुळे पंचनामा करून काटा बंद करण्यात आला. कंपनीला कारणेदाखवा नोटिसा देऊन त्यांच्याविरुद्ध वजन माप कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई केली.
तर दुसरीकडे वांधा कमिटीचे अध्यक्ष सुरेश पिरन पाटील ,सभापती अशोक पाटील , संचालक प्रा सुभाष पाटील ,डॉ अनिल शिंदे , भोजमल पाटील , समाधान धनगर ,हिरालाल पाटील ,शरद पाटील , प्रकाश वाणी ,वृषभ पारख सचिव डॉ उन्मेष राठोड यांच्यासमोर चर्चा करून साधारणतः वजनात ३६ टक्के तफावत आढळून आली. तक्रारदार दोन शेतकऱ्यांना जागेवरच व्यापारी योगेश वाणी यांच्याकडून मालाचा मोबदला देण्यात आला. त्यांनतर देखील आधी माल मोजून गेलेल्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या त्यांचे देखील म्हणणे ऐकून घेत सभापती अशोक पाटील यांनी असा निर्णय घेतला की शेतकरी ,कर्मचारी , कंपनी यांनी संयुक्त रित्या सीसीटीव्ही फुटेज तपासून शेतकऱ्यांचा माल पाहून त्याचा सरासरी अंदाज लावून मालात किती तफावत आढळून येते तसा मोबदला कंपनीने अथवा खरेदीदार व्यापारी योगेश वाणी यांनी द्यावा असा निर्णय दिला. आणि कंपनीचे तीन वर्षांचे दप्तर जमा करून ते तपासून पोलिसात तक्रार देण्याचा निर्णय घेण्यात आला.




