
अमळनेर :- नगरपरिषदेकडून मालमत्ता व गाळे भाडे थकबाकीदारांवर कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला असून गुरुवारी दि. १२ मार्च रोजी नगरपरिषदेच्या पथकाने शहरातील लालबाग शॉपिंग आणि हाशीमजी शॉपिंग येथील एकूण ७ गाळ्यांवर सील लावण्याची कारवाई केली. या गाळ्यांवर मिळून अंदाजे सहा लाख रुपयांची थकबाकी असल्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाकडून देण्यात आली.

नगरपरिषदेने वारंवार नोटिसा देऊनही संबंधित गाळेधारकांनी थकबाकी भरली नसल्याने अखेर कठोर कारवाई करण्यात आली. शहरातील थकबाकी वसुली मोहिमेअंतर्गत पुढील काही दिवसांत अशाच प्रकारे इतर थकबाकीदारांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात कर अधिकारी,अनिल बोरसे, लौकिक समशेर, मिळकत व्यवस्थापक विजय बागुल, वरिष्ठ लिपिक मनोज सोनार यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता. नगरपरिषदेने गाळेधारक व नागरिकांना थकबाकी तातडीने भरून सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, अन्यथा पुढील काळात आणखी कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.




