
अमळनेर : शेतकऱ्यांनी चारायला दिलेल्या तीन गायी गुराख्यानी परस्पर विकल्याची घटना शिरूडनाका परिसरात १२ मार्च रोजी उघडकीस आली.

राजेंद्र सुपडू पाटील याने त्याची गाय सागर श्याम परदेशी रा राजाराम नगर व भैय्या भगत रा बोरसे गल्ली याना चारायला दिलेली होती. त्याचप्रमाणे निलेश प्रकाश सूर्यवंशी व कृष्णा रतन ठाकरे यांनी देखील आपली एक एक गाय दोन्ही गुरख्याना चारायला दिलेली होती. राजेंद्र पाटील यांची गाय परत आली नाही म्हणून ते दोघांना विचारत होते. तेव्हा दोघांनी तुमची गाय कोठे पळून गेलीआम्हाला माहीत नाही असे उत्तर देत होते. १२ मार्च रोजी रात्री साडे बारा वाजता राजेंद्र च्या मित्राने त्याला सांगितले की तुमची गाय दोघांनी कोणाला तरी विकून टाकली आहे. नंतर कळले की कृष्णा ठाकरे व निलेश सूर्यवंशी यांच्या गायी देखील त्यांनी विकून टाकल्या आहेत. राजेंद्र ने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून दोन्ही गुराख्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता ३१६(२) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत.




