
संपावर उतरण्याच्या तयारीत असण्याचा इशारा दिल्यावर निघाला तोडगा…
अमळनेर : नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार तीन महिन्यांपासून केलेला नसल्याने कर्मचारी १९ पासून संपावर उतरण्याच्या तयारीत असण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. यावर संयुक्त बैठकीत सन्माननीय तोडगा निघाल्याने कर्मचाऱ्यांनी बंदचा निर्णय मागे घेतला आहे.

अमळनेर नगरपरिषदेचा पाणी पुरवठा करण्याचा कंत्राट देण्यात आला असून १ डिसेंबर ते फेब्रुवारी २६ पासून कंत्राटी कर्मचार्यांना नियमित वेतन मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती. कंत्राटदाराला पालिकेकडून बिल मिळत नाही म्हणून कंत्राटदार कामगारांचा पगार करत नाही अशी परिस्थिती होती. ३०० रुपये रोज या तुटपुंज्या पगारावर जेमतेम काम करणाऱ्या कर्मचार्यांना दैनंदिन गरजा भागवणे आणि औषधोपचार करणे अवघड झाले होते. म्हणून सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारीना निवेदन दिले होते. त्यात त्यांनी वेतन न झाल्यास १९ रोजी पाणी पुरवठा काम बंद करण्याचा इशारा दिला होता.
नगराध्यक्ष डॉ परीक्षित बाविस्कर , मुख्याधिकारी गणेश शिंदे , उपनगराध्यक्ष प्रशांत निकम ,उपमुख्याधिकारी रवींद्र चव्हाण , पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील , पाणी पुरवठा अभियंता प्रविण बैसाणे आणि कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. कामगारांनी तोडगा काढण्याची विनंती केली.
यावर पालिकेने कंत्राटदाराला एक बिल तातडीने अदा करावे आणि कंत्राटदाराने कामगारांना दोन महिन्याचे बिल अदा करावे. लगेच पुढचे बिल मिळाल्यावर उर्वरित एक महिन्याचे वेतन देण्यात यावे असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कामगारांनी समाधान व्यक्त करत काम बंदचा निर्णय मागे घेतला आहे.




