
अमळनेर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घनकचरा व्यवस्थापन कामगार आणि ठेकेदार मधील वाद तडजोडीअंतर्गत मिटला आहे.

अमळनेर नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनातील कंत्राटी ६० कामगारांना ठेकेदाराने गेल्या चार वर्षांपासून ईपीएफ ची रक्कम दिलेली नाही अशी तक्रार करण्यात आली होती. या कामगारांनी मुख्याधिकारी ,पी एफ सह आयुक्त ,जिल्हाधिकारी , माजी आमदार शिरीष चौधरी यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. नगरसेवक नावेद शेख यांनी देखील कामगारांची बाजू घेत न्याय मिळत नाही तोपर्यंत ठेकेदाराचे बिल , सुरक्षा रक्कम देऊ नये अशी मागणी केली होती. दोघांचे वाद मिटवण्यासाठी दोन तीन बैठका फिस्कटल्या. अखेरीस माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या निर्देशानुसार पालिकेच्या सभागृहात २० रोजी बैठक झाली त्यात नगराध्यक्ष डॉ परीक्षित बाविस्कर , नगरसेवक अनिल महाजन , मुख्याधिकारी गणेश शिंदे , आरोग्य निरीक्षक संतोष जाधव ,ठेकेदार रामदास पवार , सुपरवायझर खलील शेख , मेहुल बिऱ्हाडे यांच्यासह कामगारांची बैठक झाली. ठेकेदाराने मागील पी एफ च्या मोबदल्यात कामगारांच्या बँक खात्यात प्रत्येकी २५ हजार रुपये जमा करून यापुढे वेतन बँक खात्यात जमा करावे असे सर्वानुमते ठरले. यानंतर कामगारांची कोणतीही तक्रार राहणार नाही. कर्मचारी आणि ठेकेदारातील वाद मिटवण्यासाठी संजय पाटील , नावेद शेख , पंकज चौधरी यांचे सहकार्य लाभले.




