
अमळनेर:- तालुक्यात १९ मार्चला झालेल्या वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोसाट्याचा वारा व हलक्या हलक्या सरी पावसामुळे बाजरी, ज्वारी, मका, गहु, दादर या पिकांना जोरदार फटका बसला. वाऱ्याच्या तीव्रतेमुळे उभी पिके आडवी झाली.

रब्बी हंगामातील मका कापणीच्या अंतिम टप्प्यात आला होता. मका कापणीसाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांचा मका व गहू शेतात उभा होता. काही ठिकाणी गव्हाची कापणी पूर्ण झाली असली तरी मळणीचे काम सुरू असताना अचानक झालेल्या हलक्या स्वरूपाचा पावसामुळे कापलेला गहू,मका,ज्वारी भिजला. त्यामुळे मका व गहू खराब होण्याची शक्यता आहे. परिणामी उत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.
चिमणपुरी पिंपळे परिसरासह तालुक्यात ज्वारीसह मक्याचे नुकसान झाले असून हात तोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे हिरावून घेण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
प्रतिक्रिया…
शासनाने आर्थिक मदत द्यावी, पंचनामे करावेत
गहू, मका ज्वारी दादर आणि इतर पिकांची स्थिती चांगली होती. अचानक झालेल्या वादळी वाऱ्यामुळे व हलके स्वरूपाचे पावसामुळे सगळे गणित बिघडले आहे. अनेक ठिकाणी पिके आडवी पडली आहे. वेळेवरती मजूर मिळत नसल्यामुळे कापणी वेळेत करता येत नाही आणि दुसरीकडे अधूनमधून पडणाऱ्या जोराचा वारा व पावसामुळे पीक भिजून खराब होते आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी.
– युवराज पाटील शेतकरी, पिंपळे( सामाजिक कार्यकर्ते)




