
अमळनेर : चाळीस लाख रुपयांच्या भाडे थकबाकीपोटी पालिकेने चार शाळा सील केल्याची कारवाई रविवारी करण्यात आली.

पालिकेने मार्च अखेर वसुलीचा सपाटा सुरू केला आहे. पाणीपट्टी कराच्या थकबाकीपोटी नळ कनेक्शन कापणे आणि मालमत्ता धारकांकडे असलेला मालमत्ता कर आणि भाडे थकबाकीपोटी मालमत्ता सील करण्याची कारवाई सुरू केली आहे. २२ मार्च रोजी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळकत व्यवस्थापक लौकिक समशेर , वरिष्ठ लिपिक विजय बागुल, राजू वानखेडे ,मनोज सोनार यांनी मुंदडा इंग्लिश मिडीयम स्कूल, छत्रपती शिवाजी महाराज विद्यामंदिर तांबेपुरा, न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, अनिल अंबर उर्दू शाळा नंबर ११ या शाळांच्या प्रवेशद्वारावर सील लावले आहे.
दरम्यान मार्च महिना सुरू झाला असून विद्यार्थ्यांच्या शालेय परीक्षा सुरू होणार आहेत. शाळांना सील लावल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे. शिक्षकांची हजेरी , अध्यापन कार्य रखडणार आहे. वेतन , आयकर आदी बाबींवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.
प्रतिक्रिया…
सुट्ट्यांच्या दिवशी सुद्धा वसुली आणि कर भरणा सुरू आहे. नागरिकांनी त्वरित थकबाकी भरावी अन्यथा जप्ती ,सील लावणे ,कुलूप लावणे आदी प्रकारची कारवाई केली जाईल – गणेश शिंदे, मुख्याधिकारी अमळनेर नगरपरिषद अमळनेर




