
अमळनेर : आपल्या मुलीच्या आजारपणासाठी नेण्यात येणारे महिलेचे हरवलेले पैसे केंद्रप्रमुखाच्या प्रामाणिकपणामुळे परत मिळाले आहेत.

अमळनेर तालुक्यातील गडखांब येथील कल्पना संजय पाटील ही महिला आपल्या मुलीला शिरसोली भेटण्यासाठी जळगाव बसने जात होती. तिने स्वतंत्र फायनान्स कंपनीकडून कर्ज काढून त्यातील दहा हजार रुपये आपल्या मुलीच्या आजारपणसाठी नेत होती. याच बसमध्ये केंद्रप्रमुख राजेंद्र पाटील देखील होते. महिला आधीच आकाशवाणी चौकात उतरली आणि बस जळगाव स्टँडवर गेली. सर्व प्रवासी उतरले. बस आगारात जाऊन एक तास थांबली. इकडे केंद्र प्रमुख संभाजीनगर जाण्यासाठी बसची वाट पाहत होते. अमळनेरहून आलेलीच बस आगारातून बाहेर येऊन संभाजीनगर साठी लागली. त्यात अनेक प्रवाशी चढल्यानन्तर देखील राजेंद्र पाटील यांना प्लास्टिक पिशवी एका सीटवर पडलेली सापडली. पिशवीत गडखांब येथील महिलेचे बँक पासबुक ,पॅन कार्ड ,आधार कार्ड आणि दहा हजार रुपये रोख सापडले. राजेंद्र पाटील यानी महिलेचा नम्बर शोधून त्यांना कळवले. महिला परत आल्यानन्तर त्यांना ती रक्कम व पिशवी प्रामाणिकपणे परत करण्यात आली. त्यांनी राजेंद्र पाटील यांच्या प्रमाणिकपणाचे आभार मानले. यावेळी सी के जाधव , लीलाधर पाटील हजर होते.




