
अमळनेर: जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या खान्देशच्या कन्या कु. प्रेरणा कैलास खवळे यांचा लोणचारम (ता. अमळनेर) येथे भव्य सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. मातंग समाजातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्या त्या पहिल्या मुलगी ठरल्याने, परिसरात अभिमानाचे वातावरण आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी कु. प्रेरणा खवळे यांची गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. गावकऱ्यांनी त्यांचे औक्षण करून जंगी स्वागत केले. लोणचारमची चुलत भाची असलेल्या कु प्रेरणा खवळे यांनी मिळवलेल्या यशामुळे संपूर्ण गावात चैतन्याचे वातावरण होते.
या सत्कार समारंभास महाराष्ट्र भाजप सरचिटणीस भैरवी वाघ यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रेरणा खवळे यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना भैरवी वाघ म्हणाल्या की, “प्रेरणाचे यश हे केवळ एका कुटुंबाचे नसून संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे.” तसेच सत्काराला उत्तर देताना प्रेरणा खवळे यांनी आपल्या यशाचा प्रवास उलगडला. त्या म्हणाल्या, “यशासाठी सातत्य, मेहनतीची तयारी आणि कुटुंबाचे पाठबळ अत्यंत आवश्यक असते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी न्यूनगंड न बाळगता मोठी ध्येये ठेवून अभ्यास करावा.”
महेश पाटील आणि हरिश्चंद्र कढरे गुरुजी यांनी देखील आपली मनोगते व्यक्त करून प्रेरणा यांच्या यशाचे कौतुक केले.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री. संजय बाबुराव थोरात, ग्रामस्थ लोणचारम व समस्त मातंग समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरपंच प्रा. शशिकांत पाटील यांनी केले, तर उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांचे आभार मधुकर पाटील यांनी मानले. यावेळी विश्वास पाटील लोण सिम, सौ.सीमा विवेक पाटील सरपंच,लोणचारम,दीपक सुभाष पाटील, उपसरपंच,लोण चारम,विवेक पाटील सदस्य,लोणचारम,दीपक अशोक पाटील,काशिनाथ पाटील, रवींद्र वैध्ये,सुरेश पाटील माजी उपसरपंच लोण चारम,वसंत पाटील, शालिक पाटील, चुडामन पाटील,मालोजी पाटील,पत्रकार सुरेश कांबळे,जितू कढरे, प्रवीण शिरसाठ, डॉ राजू कांबळे,बाळासाहेब अवचिते,उमेश पाटील,भटू संजय पाटील,सचिन संजय पाटील,मदन खवळे,मंगल खवळे, पोलीस पाटील लोणखुर्द, लोण सिम,लोण बुद्रुक आदी होते




