
वाहतुकीची कोंडी सोडवायला प्रशासनाला अपयश, सामान्यांचे हाल…
अमळनेर : शहरातील बोरी नदीवरील पूल आता डेली बाजार झाला असून वाहतुकीची कोंडी सोडवायला प्रशासनाला अपयश आले आहे. पुलावरची जबाबदारी घ्यायला कोणताच विभाग तयार नसल्याने सामान्य जनतेचे हाल होत आहेत.

आधीच धुळे चोपडा रस्त्यावर अमळनेर शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण ,हातगाड्या , अवैध प्रवाशी वाहतुक , दुकानंदारांचे ग्राहक यामुळे रस्ता कोंडला गेला आहे. त्यात आता बोरी नदीच्या पुलावर आता नारळ , मासे , फळे , भाजीपाला , कांदा ,लसूण यांचा बाजार सुरू झाला आहे. बोरी नदीच्या पुलावर बिनधास्त पणे हातगाड्या उभ्या राहतात , त्यांच्या बाजूला मोटरसायकल किंवा चार चाकीवरच ग्राहक उभे राहतात. मागाहून येणारी वाहने थांबून राहतात. हातगाड्या वाल्याना जनतेची पर्वा नाही. विद्यार्थ्यांना देखील त्रास होत आहे. नगरसेवक , लोकप्रतिनिधी मूग गिळून बसले आहेत.
अतिक्रमण हटवण्याची अथवा न होऊ देण्याची जबाबदारी पालिका , पोलीस यांची असली तरी नदी आणि त्यावरील पूल याला महसूल विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने राज्य मार्गावरील अतिक्रमणा बाबत सर्रास दुर्लक्ष केले आहे. तर पालिकेचे अतिक्रमण विभाग पथक अस्तित्वात आहे की नाही याचीही जनतेला माहिती नाही. त्यामुळे कोणीही कुठेही अतिक्रमण करतो आणि कर्मचारी अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकून सामान्य जनतेला वेठीस धरत आहेत.
बोरी नदीवर ५० ते २०० मीटर वर तीन पूल बांधण्यात आले आहेत. मात्र दोन पुलांवरून वाहतूक होत नाही. म्हणून एकाच पुलावर गर्दी होते. त्यावरही आता बाजार भरू लागला आहे.
बोरी नदीवरील गांधलीपुरा पुलाला बाहेर निघायला रस्ताच नसल्याने हा पूल सदोष बांधण्यात आला आहे. तत्कालीन राजकीय नेत्यांच्या दबावाखाली गांधलीपुरा पूल राज्य मार्ग सहा वर दाखवून सार्वजनिक बांधकाम खात्याने मोठी चूक केली आहे. गेल्या सात वर्षांपासून साडे सात कोटी खर्चून बांधलेला पूल अजूनही निरुपयोगी ठरला आहे. बोहरा समाज आणि वफ्फ बोर्ड यांच्यातील वादामुळे रस्त्यांसाठी जागा संपादन करण्याचा प्रश्न अनेक दिवसापासून जिल्हाधिकारीकडे प्रलंबित आहे. त्यामुळे ही समस्या कायम आहे.
बसस्थानक व इतर अनेक ठिकाणी दुकान दारांनी आपले शेड आणि ओटे वाढवल्याने वाहनांना त्रास होतो. पायी चालणाऱ्यांना अवघड झाले आहे. नवीन होणाऱ्या प्रशासकीय इमारतीसमोर रस्त्यालगत दररोज अतिक्रमण वाढत आहे.
लवकरच बोरी पुलावरील हातगाड्या अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया केली जाईल. आणि गांधलीपुरा पुलावरून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. –सुभाष राऊत ,कार्यकारी अभियंता , सार्वजनिक बांधकाम विभाग अमळनेर




