
हनुमान जयंती साजरी करून काल्याच्या कीर्तनाचा महाप्रसाद वाटून होईल सांगता
अमळनेर – तालुक्यातील पाडळसरे येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही ग्रामस्थ व संत तुकाराम महाराज भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदू नववर्षाच्या प्रारंभ निमित्त श्रीराम जन्मोत्सव व ग्रामदैवत इच्छापूर्ती अंबिका देवीचा जागर म्हणून दिनांक 26 पासून चैत्रोत्सव साजरा केला जाणार आहे, व शेवटी हनुमान जयंतीला दिनांक 2 एप्रिल रोजी काल्याचे कीर्तनाने महाप्रसाद वाटून चैत्रोत्सव कार्यक्रमाची सांगता होईल.

नववर्षाच्या स्वागतार्थ चैत्रोत्सवात ग्रामदैवत इच्छापूर्ती अंबिका देवीचा जागर , श्रीराम जन्मोत्सव व हनुमान जयंतीच्या मिलाप म्हणून श्रीक्षेत्र पाडळसरे येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व श्रीमद भागवत महापुराण कथेला इच्छापूर्ती अंबिका देवीच्या मंदिराच्या प्रांगणात विधिवत गुढी उभारून विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मुर्त्या ,श्रीमद भागवत ,गीता व देवी भागवत ग्रंथ स्थापित करून अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहास दिनांक 26 रोजी दुर्गा अष्टमीला सुरुवात होईल, त्यात दैनंदिन कार्यक्रम खालील प्रमाणे राहतील दररोज सकाळी ५ ते ६ काकडा आरती , देवीची आरती व ८ ते ११ यावेळी वेदमूर्ती हभप दिलीप पाठक हे श्रीमद भागवत कथेचे निरूपण करतील , दुपारी १ ते ३ देवीचा नामजप ,सायंकाळी ५ते ६ हरिपाठ व रात्री ८:३० ते १०;३० पर्यंत जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम व देवीचा जागर होईल , हरिनाम कीर्तन सप्ताहात आळंदी येथील नामवंत कीर्तनकार यांची उपस्थिती लाभणार आहे यात दिनांक 26 रोजी हभप रामेश्वर महाराज (नागेश्वरकर )यांचे कीर्तन होईल ,दिनांक 27 रोजी हभप जयेश महाराज (निमकर) , दिनांक 28 रोजी हभप दिनेश महाराज ( निमकर ) ,दिनांक 29 रोजी हभप शामसुंदर महाराज घोडगावकर ,दिनांक 30 रोजी हभप श्रीराम महाराज (भोणेकर) ,दिनांक 31 रोजी हभप भोला महाराज ( पाडळसरेकर ), दिनांक 31 रोजी
दुपारी ४ ते ६ पालखि सोहळ्याची मिरवणूक होऊन रात्री हभप आकाश महाराज पाडळसरेकर यांचे जागरचे कीर्तन होईल तर दिनांक २ रोजी हनुमान जयंती साजरी करून सकाळी ८ ते १० यावेळेस हभप आकाश महाराज यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसाद वाटप करून कीर्तन सप्ताहाची सांगता होईल,कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थ व संत तुकाराम महाराज भजनी मंडळ यांनी केले




