
तालुक्यातील दोन पोलीस पाटलांसह अहमदनगर येथील एकावर गुन्हा दाखल…
अमळनेर : एमएसईबीत दोघांना नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने १७ लाख रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी तालुक्यातील बोरगाव व लोणपंचम येथील पोलीस पाटलांसह अहमदनगर येथील एकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

तालुक्यातील लोणपंचम येथील रामराव हरचंद पाटील यांचा पुतण्या लोण पंचम येथील पोलीस पाटील उमेश बबनराव पाटील याने त्यांना सांगितले की माझी अहमदनगर तालुक्यातील आळा फाटा येथील राजेंद्र नामदेव पोतेकर व बोरगाव येथील पोलीस पाटील गोविंदा शालीकराव शिंदे यांची बँकेच्या अधिकाऱ्यांशी व अनेक मोठ्या अधिकाऱ्यांशी ओळख असून त्यांनी अनेकांना नोकरीला लावले आहे. म्हणून रामराव पाटील यांनी त्यांची सुन करिश्मा किरण पाटील व तिचा भाऊ या दोघांसाठी नोकरीला लावण्याबाबत विचारले असता त्यांनी कागदपत्रे पाहून दोघांना एम एस ई बी मध्ये लिपिक म्हणून नोकरीला लावण्याबाबत १७ लाख रुपये लागतील असे सांगितले. ११ जून २०१५ रोजी सुनेच्या आईने शेत विकून १० लाख रुपये जमा केले. दोन्ही पोलीस पाटलांच्या ताब्यात देण्यात आले. आणखी काही दिवसांनी त्यांनी उर्वरित सात लाख रुपयांची मागणी केली. तेव्हा रामराव पाटील यांनी स्वतःच्या पत्नीचे दागिने विकून आणि भाचे जावई यांच्याकडून पैसे उसणवार घेऊन सात लाख रुपये पुतण्याच्या ताब्यात दिले. मात्र बरेच दिवस झाले तरी नोकरीची ऑर्डर आली नाही. २१ नोव्हेबर २०१५ रोजी त्यांनी सुनेच्या नावाची ऑर्डर आणली मात्र जेव्हा ते नोकरीत रुजू होण्यासाठी मुंबई गेले तेव्हा सुनेचे नाव यादीतच नव्हते. त्याबाबत विचारणा केली तेव्हा त्यांनी दुसऱ्या यादीत नाव येईल असे सांगितले. मात्र नऊ दहा महिने यादीत नाव आले नाही म्हणून रामराव पाटील यांनी दोघांना विचारणा केली असता पोतेकर यांच्या सहीचा ४ लाख रुपयांचा धनादेश आणून दिला. तो धनादेश वटला नाही म्हणून रामराव पाटील केस करतील म्हणून दोन्ही पोलीस पाटलांनी दोन लाख रुपये रोख आणून दिले. मात्र २०२५ पर्यंत वारंवार मागणी करूनही उर्वरित रक्कम परत केली नाही आणि नोकरीही दिली नाही. याबाबत मारवड पोलिसात तक्रार देण्यात आली होती परंतु पोलिसांनी दिवाणी बाब म्हणून न्यायालयात जाण्याची समज दिली होती. अखेरीस रामराव पाटलांनी याबाबत ऍड टी सी पाटील यांच्यामार्फत अमळनेर न्यायालयात धाव घेतली.ऍड पाटील यांनी युक्तिवाद केल्यानन्तर साक्षीदार तपासून न्या निलेश यलमाने यांनी रामराव पाटील यांची तक्रार ग्राह्य धरून भारतीय न्याय संहिता कलम १७५(३) प्रमाणे राजेंद्र पोतेकर , गोविंदा शिंदे आणि उमेश पाटील यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३(५) , ,३१८ ,व ३३६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.




