
अमळनेर : तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे भूजल पातळी खालावली असून सहा ते सात गावांना पाणी टंचाई जाणवू लागली असून ग्रामपंचायतींनी विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव पाठवले आहेत. तालुक्यात जलजीवन मिशन योजना मंजूर असूनही निव्वळ निधी नसल्याने आणि वीज जोडणी नसल्याने या गावांना कृत्रिम टंचाई जाणवत आहे या प्रकाराला शासनच जबाबदार आहे.

तालुक्यातील गडखांब, धूपी आणि मांजर्डी या तिन्ही गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. ग्रामस्थांसह गुरांचाही प्रश्न भेडसावणार असल्याने सरपंच नितीन पाटील व ग्रामसेवकांनी भाऊसाहेब लोटन पाटील , विजय हिरामण पाटील, मनोज हिरामण पाटील या तीन शेतकऱ्यांच्या संमती घेऊन विहिरी अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव गटविकास अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. तर धानोरा भोरटेक येथे देखील पाणी टंचाई जाणवू लागल्याने सरपंच गोपीचंद दौलत व ग्रामसेवक यांनी इंद्रसिंग राजपूत यांचा बोअरवेल अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. तर चौबारी येथे देखील तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होत आहेत. या गावांसाठी सरपंच व ग्रामसेवक यांनी भोरटेक शिवारातील मधूकर पाटील यांच्या विहिरीला चांगले पाणी असल्याने विहीर अधिग्रहित करून तेथून गावाला पाणीपूरवठा करण्याचा प्रस्ताव गटविकास अधिकाऱ्यांना पाठवला आहे. जुनोने येथे देखील टंचाईची तीव्रता वाढली असून ग्रामपंचायतींनी पूर्वतयारी म्हणून फेब्रुवारी महिन्यापासूनच प्रस्ताव पाठवले आहेत.
दरम्यान भोरटेक सोर्स पूर्ण ,पम्पिंग पूर्ण आहे फक्त पाणी पुरवठा करण्यासाठी वीज जोडणी बाकी असल्याने योजना कार्यान्वित नाही आज मात्र पाणी टंचाई जाणवत आहे , धानोरा येथे वितरण लाईन पूर्ण आहे परंतु कामाचा ठेकेदार बिल मिळत नाही म्हणून काम करत नाही, पंप हाऊस बाकी आहे. जुनोने योजना पूर्ण आहे , चौबारी ला देखील पाणी पुरवठा योजनेचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र कामाचे बिल मिळाले नाही म्हणून ठेकेदाराने वितरण योजना आणि पाईप काम पूर्ण केले नाही , गडखाम्ब पंप हाऊस नाही , तेथे देखील ठेकेदाराला बिल मिळाले नाही म्हणून कामे पूर्ण होत नाही.
प्रतिक्रिया…
सहा सात गावांना पाणी टंचाई जाणवत असून त्यांचे विहीर व बोअर अधिग्रहित करण्याचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. हे प्रस्ताव ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे पाठवण्यात आले आहेत.- एन आर पाटील ,गटविकास अधिकारी, पंचायत समिती अमळनेर
प्रतिक्रिया…
गेल्या दोन वर्षांपासून जलजीवन मिशन योजनांचा निधी मिळाला नाही. राज्य सरकारकडून २० टक्के निधी प्राप्त आहे. केंद्राचा निधीच मिळला नाही. म्हणून ठेकेदार काम पूर्ण करत नाहीत. प्रस्तावांची खात्री करून मंजुरीसाठी तहसीलदारांना प्रस्ताव पाठवले जातील.- धीरज पाटील , उपविभागीय अभियंता ,ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अमळनेर




