
अमळनेर : एक महिना उलटून गेला तरी पालिकेची मार्च महिन्याची मासिक सभा घेण्यात आली नाही म्हणून नियमांचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अमळनेर शहर विकास आघाडीच्या ११ नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

अमळनेर पालिकेची अखेरची सभा २४ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. नंतरची सभा ३० दिवसांच्या आत घेणे १९६५ च्या महाराष्ट्र नगरपरिषद,नगरपंचायती औद्योगिक अधिनियम ४० च्या कलम ५१ ,५२ ,५३ अन्वये अनिवार्य होते. अमळनेर नगरपरिषद मूलभूत सुविधांसाठी, विकासकामांसाठी नागरिक व लोकप्रतिनिधींचे अर्ज आलेले आहेत. त्यावर चर्चा करण्यासाठी मासिक सभा लोकनियुक्त नगराध्यक्षानी आयोजित करायला पाहिजे होती. मात्र मार्च उलटला तरी सभा घेण्यात आली नाही म्हणून नियमांचा भंग झाला आहे. म्हणून जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शहर विकास आघाडीच्या जयश्री अनिल पाटील , स्वप्ना विक्रांत पाटील , कविता विजयसिंग राजपूत , सचिन विभाकर कासार , सचिन बळवंत पाटील, विजय कहारू पाटील, भरत सुरेश ललवाणी , देवेंद्र भानुदास कांबळे , अफसाना मुख्तार खाटीक , प्रवीण गंगाराम पाटील ,शोभबाई भिवंसन गढरे आदी नगरसेवकांनी केली आहे.
अमळनेर नगर परिषदेच्या माध्यमातून आगामी एप्रिल महिन्यातील महात्मा जोतिबा फुले जन्मोत्सव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अमळनेरची अक्षयतृतीया – संत सखाराम महाराज यात्रा उत्सव नियोजन व शहरातील विविध समस्या, तक्रारी व विकासकामांची मागणी यासाठी दर महिन्याची सर्वसाधारण सभा घेणे आवश्यक आहे. मात्र कायदेशीर शासन आदेश असून सुद्धा सत्ताधारी दर महिन्याची सर्वसाधारणपणे सभा घेत नसून अमळनेरकर नागरिकांचे समस्या, तक्रारी व नगरसेवकांचे नागरीहितांचे प्रश्न सोडविण्या पासून पळ काढीत आहेत. – विजय पाटील ( नगरसेवक, पैलाड)




