
अमळनेर :- शहरातील भगवा चौक परिसरात महालक्ष्मी प्रोव्हिजन समोरील मंगळवारी दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास मोठे झाड अचानक कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र झाडाखाली अडकून एका मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच १८ बीएफ २४०१ क्रमांकाची अजिक्य पाटील यांची बजाज कंपनीची मोटारसायकल झाडाखाली दाबली गेल्याने तिचे नुकसान झाले. संबंधित परिसरात विद्यार्थ्यांचा नेहमीच वावर असतो तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. दुपारच्या सुमारास वर्दळ कमी असल्याने मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, झाड कोसळल्यानंतर भगवा चौक परिसरातील वीजपुरवठा काही काळासाठी खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागला.
घटनेची माहिती मिळताच उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी तात्काळ संबंधित यंत्रणेला झाड हटविण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर काही वेळात मार्ग मोकळा करण्यात आला.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात वारंवार वादळी वारे वाहत असल्याने धोकादायक व जीर्ण झाडांची तातडीने पाहणी करून छाटणी अथवा तोड करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने याबाबत गांभीर्याने दखल घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.




