
तालुक्यातील मांडळ येथे सुप्रसिद्ध व्याख्याते समाज परिवर्तनकार वसंत हंकारे यांचे प्रतिपादन
अमळनेर : तुमच्या जन्मापासून तुम्हाला घडविण्यापर्यंत आईच्या रक्ताचे आणि वडिलांच्या घामाचे योगदान असते म्हणून त्या आई बापाला विसरू नका त्यांच्याशिवाय तुमच्या जीवनाला शून्य अर्थ आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते समाज परिवर्तनकार वसंत हंकारे यांनी अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे केले.

शिवशाही समिती व मांडळ ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने मांडळ येथे शिव छत्रपती चौकात “न समजलेला बाप समजून घेताना” या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. सुरुवातीला छत्रपतींच्या पुतळ्याचे पूजन करून कु पूर्वशी पाटील हिच्या हस्ते आरती करण्यात आली. वसंत हंकारे यांनी समाजातील सध्याच्या परिस्थितीवर , पळून जाणाऱ्या मुलींच्या विषयाला , आई बापाला सोडणाऱ्या मुलांच्या विषयाला हात घालत सुरुवातीला विनोदी शैलीत प्रेक्षकांना हसवले आणि नंतर गंभीर होत मुलांसाठी आई वडिलांचे त्याग आणि कष्टमय जीवनावर प्रकाशझोत टाकत तरुणाईच्या डोळ्यात अंजन घातले. आपल्या धीरगंभीर आवाजात आई वडील मुलगा मुलगी यांच्यातील नाते घट्ट करण्याच्या भावनिक आव्हानाला प्रेक्षकांच्या साश्रुनयनांनी प्रतिसाद दिला.
या व्याख्यानाला मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील , डॉ सुनील चोरडिया , संजय पाटील , प्रभूदास पाटील , सीताराम कोळी , कलमाडी सरपंच सोनू झालसे यांच्यासह परिसरातील कलमाडी , वावडे ,तरवाडे ,मुडी , हेंकळवाडी , तामसवाडी, मोहाडी , जवखेडा ,कंचनपूर आदी ठिकाणच्या पालक आणि पाल्यानी हजेरी लावली होती.




