
अमळनेर पोलिसांनी इंदोर येथून एकाला केली अटक
अमळनेर : तालुक्यातून गांधली येथील पेट्रोल पंपावरून चोरून नेलेले डंपर तोडलेल्या अवस्थेतच पोलिसांना इंदोर येथे सापडले असून चोरट्यांची नावे निष्पन्न करण्यात देखील पोलिसांना यश आले असून एकाला इंदोर येथून अटक करण्यात आली आहे.

निलेश संजय पाटील रा हिंगोणे यांचे १५ लाख रुपयांचे डंपर क्रमांक एम एच ४८ ए जी ८३०७ हे ३१ रोजी गांधली येथील पेट्रोल पंपावर लावलेले असतांना रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले. एव्हढे मोठे डंपर चोरले गेल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज , पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर , हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार , विनोद संदानशिव , निलेश मोरे , सिद्धांत शिसोदे , प्रशांत पाटील यांना तपासाला पाठवले. डंपर पातोंडा मार्गे पुढे गेले मात्र नेमके कुठे गेले याची माहिती मिळेना. ठिकठिकाणी वेगवेगळ्या रस्त्यावर सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक माहिती घेऊन पोलीस डंपर चा मागोवा घेत मध्यप्रदेश, गुजरात व परत मध्यप्रदेशात पोहचले. एक दोन नव्हे तर तब्बल नऊ दिवस पोलीस मध्यप्रदेशात मुक्कामी होते. अखेर पोलिसांनी खबरी मार्फत माहिती काढली असता त्यांना खाजू खान चांद खान रा तेजाजी नगर इंदोर याने गोदाम भाड्याने घेतले असून त्याठिकाणी चोरलेली अथवा इतर मोठी वाहने आणून ट्रक बॉडी मेकर्स मध्ये त्यांचे भाग वेगळे केले जात असल्याचे समजले. पोलिसांनी छापा टाकला असता त्यांना चोरीस गेलेल्या ट्रक चे भाग कापून वेगळे झाल्याचे दिसले. पोलिसांनी खाजू खान याला अटक करून डंपर चे सर्व भाग केबिन ,चेसिस ,बॉडी , एअर टॅंक ,डिझेल टॅंक सर्व जमा करून दुसऱ्या एका ट्रक मध्ये अमळनेर पोलीस स्टेशनला आणले आहे. खाजू खान यांच्याकडून तिन्ही चोरट्यांची नावे निष्पन्न केली असून लवकरच तिघांना अटक करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी सांगितले.




