
अमळनेर : उन्हाळी हंगाम २०२६ च्या पीक पाहणी प्रयोगाला ८ एप्रिल पासून शुभारंभ झाला असून शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांची लागवड केली असल्यास विविध शासकीय लाभ मिळवण्यासाठी पीक पाहणी मुदतीत पूर्ण करावी असे आवाहन प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी केले आहे.

पीक विमा , नुकसान भरपाई , आपत्ती आल्यास पाऊस ,वादळाने नुकसान झाल्यास भरपाई वेळेवर मिळण्यासाठी तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी , किमान आधारभूत किमतीने धान्य अथवा शेतीमाल विकण्यासाठी , पीक कर्ज सुविधा मिळण्यासाठी ,ऍग्री स्टॅक योजनेतील सर्व लाभ आणि अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या सातबाऱ्यावर पीक पेरा नोंदणे आवश्यक आहे.
उन्हाळी पिकांची नोंद सात बारा उताऱ्यावर नोंदण्यासाठी प्ले स्टोअर वर डी सी एस ऍप उपलब्ध असून शेतकऱ्यांनी ते डाउनलोड करून ऑनलायीन पीक पाहणी मुदतीत करून घ्यावी ८ एप्रिल पासून पीक पाहणी प्रयोग नोंदवण्याला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामात पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी अचूक पीक पाहणी करून घ्यावी असे आवाहन प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी केले आहे.




