
अमळनेर : यात्रेपूर्वीच पावसाळा पूर्वीचे कामे करून नाले सफाई कामास आरोग्य विभागाने सुरुवात केली आहे. नाले सफाई करून गाळ काढणे सुरू केले असून शेकडो टन गाळ काढण्यात आला आहे. मात्र हा गाळ रस्त्यावर न टाकता त्वरित उचलून डंपिंग ग्राऊंडवर नेण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

शहरात पिंपळे रोड , पिंपऱ्या नाला ,विप्रो नाला , धुळे रोड नाला, गांधीनगर , बालेमिया जवळ असे एकूण पाच मोठे आणि उर्वरित लहान नाले मिळून सतरा नाले आहेत. अमळनेर चा संत सखाराम महाराज यात्रोत्सव जवळ आल्याने भाविक भक्तांच्या तसेच यात्रेकरूसह स्थानिक नागरिकांचे आरोग्य अबाधित रहावे म्हणून नाले सफाई मोहीम हाती घेतली आहे.
नाल्यांमध्ये गाळ , काडी कचरा , प्लास्टिक पिशव्या , भंगार , तुटलेल्या लाकडी , फाटक्या कापडी वस्तू अडकून पावसाळ्यात नाले तुडुंब भरतात. त्यामुळे पाणी साचून नागरिकांचे आरोग्य बिघडते. यात्रेच्या काळात काम केले तर उघड्यावर पडलेला गाळ अथवा कचरा उघड्यावर पडल्याने जीवजंतू तसेच दुर्गंधी पसरून आरोग्य बिघडण्याची शक्यता होती म्हणून यात्रेपूर्वीच सफाई मोहीम हाती घेण्यात आली.
आरोग्य सभापती रामकृष्ण पाटील यांच्यासह आरोग्य निरीक्षक किरण कंडारे , संतोष जाधव ,संतोष माणिक , पर्यवेक्षक श्याम करंदीकर , सतीश बिऱ्हाडे , कुंदन सोनवणे , योगेश पवार यांनी शहराचे चार भाग पाडून शहरातले पाच मोठे आणि इतर लहान नाल्यातील गाळ कचरा काढणे सुरू केले आहे.
संपूर्ण १८ मुकादमना सक्त सूचना देऊन शहर व परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. नदी पात्रातील देखील गाळ काढून परिसर स्वच्छ केला जाईल- किरण कंडारे ,आरोग्य निरीक्षक ,अमळनेर नगरपरिषद




