
अमळनेर:-समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने रस्त्याने जात असलेल्या दुचाकीस्वार युवकाचा पाडसे गावाजवळ जागीच मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक 13 मे रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास घडली.

गोपाल (उज्वलसिंग) आनंदसिंग राजपुत,वय 38 वर्ष, असे मयत व्यक्तीचे नाव असून तो मावशीला सोडण्यासाठी कळंबु येथून चौबारी जवळील भोरटेक येथे आला होता,त्यांना सोडून पुन्हा गावाकडे जात असताना पाडसे गावाच्या पुढे समोरून येणाऱ्या कुणीतरी अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली यात गोपाल याचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत मारवड पोलिसांनी घटनेचा पंचनामा केल्यानंतर अमळनेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.आशिष पाटील यांनी शवविच्छेदन केले.सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात गोपाल वर अंत्यसंस्कार करण्यात आले.याबाबत संदीप यांनी मारवड पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस संबंधित वाहनचालकाचा कसून शोध घेत आहेत.पुढील तपास पोलीस करीत आहेत.
गोपाल आईच्या गर्भात असतानाच वडीलांचे अपघाती निधन झाले होते, आता गोपाल चा देखील कमी वयातच अंत झाल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.त्याच्या पश्चात आई,पत्नी,2 लहान मुली असा परिवार असून राजेंद्र गुबासिंग राजपुत यांचा तो पुतण्या तर राज विकाससिंग राजपुत यांचा चुलत बंधु होता.




