
माघारीसाठी उद्या अखेरची मुदत, बिनविरोधची शक्यता मावळली, तीन पॅनल होण्याचे संकेत
अमळनेर:- तालुका शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत एकूण १५५ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. त्यापैकी आतापर्यंत फक्त ५ जणांनी एकेका पदावरुन अर्ज मागे घेतले आहेत.तरीसुद्धा अन्य मतदार संघात त्यांचे अर्ज शिल्लक आहेतच असे चित्र आहे.

माघारीसाठी 20 मे रोजी अखेरची मुदत असुन या मुदतीत कोण अर्ज मागे घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.इच्छुक उमेदवारांची संख्या लक्षात घेता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास मावळली राष्ट्रवादी, भाजप व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी तयारी केली असल्याने जवळपास तीन पॅनलमध्ये लढत होण्याचे संकेत मिळाले आहेत.शेतकी संघ आर्थिक संकटात असताना या संस्थेची निवडणूक बिनविरोध न होणे हे आश्चर्यकारक ठरणार आहे. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ही निवडणूक होत असल्याने या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे.
आतापर्यंत श्रीनाथ रविंद्र पाटील, शहापूर, सुरेश अर्जुन पाटील, सुंदरपट्टी, दिपक वसंतराव पाटील, झाडी, व विजय शेखनाथ पाटील, झाडी आणि सचिन योगराज पाटील, पाडळसरे यांनी प्रत्येकी एकेका ठिकाणाहून उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
शेतकी संघात व्यक्तिशःतून ६८,सोसायटीत ३६, महिलांमध्ये १६,ओबीसीत १९,अनुसूचित जाती /जमातीसाठी ६ व व्हीजेएनटी करिता १० जणांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. त्यापैकी आताशी ५ अर्ज मागे घेतले गेले असल्याचे कळते.
दरम्यान एकूण 15 जागांसाठी ही निवडणूक होत असून उद्या 20 रोजी माघारीच्या अखेरच्या दिवशी अनेकांचे अर्ज मागे होण्याची शक्यता आहे.व्यक्तिशः 5 आणि सोसायटीच्या 5 जागांसाठी अधिक चुरस दिसून येत आहे.याशिवाय इतर जागांवर देखील अनेक इच्छुक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. ही निवडणूक बिनविरोधची शक्यता नसल्याने 20 रोजी माघारी नंतर 21 रोजी चिन्ह वाटप होऊन 30 मे रोजी मतदान व 31 मे रोजी मतमोजणी होणार आहे.संघ आर्थिक संकटात असला तरी बहुसंख्य उमेदवार मातब्बर असल्याने निवडणुकीत मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन घडविले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.




