अमळनेर : तालुक्यातील सावखेडा येथे वाळूच्या ठेक्यांवर सुमारे १ लाख ५५ हजार रुपये किमतीचा १५२० लिटर डिझेलचा बेकायदेशीर साठा आढळून आल्याची घटना २७ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. अमळनेर पोलीस स्टेशनला जीवनावश्यक वस्तू कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तापी नदीच्या पात्रात सावखेडा येथे वाळूच्या ठेक्याजवळ बेकायदेशीर डिझेल चा साठा असल्याची माहिती तहसीलदार रुपेशकुमार सुराणा याना मिळाल्यावरून त्यांनी प्रभारी पुरवठा निरीक्षक सचिन निकम याना बोलावून आमच्यासोबत छापा मारण्यास सांगितले. उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे , डीवायएसपी , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा , पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , मंडळाधिकारी कल्याणी पाटील , ग्राम महसूल अधिकारी पवन शिंगारे यांनी सावखेडा येथे नदीत जाऊन छापा मारला असता त्यांना २०० लिटर मापाचे १० डिझेलचे कॅन आढळून आले. त्यात १ लाख ४२ हजार ८०० रुपये किमतीचे ७ कॅन मध्ये प्रत्येकी २०० लिटर असे एकूण १४०० लिटर डिझेल , १० हजार २०० रुपये किमतीचे दोन कॅन मध्ये प्रत्येकी ५० लिटर डिझेल तर २ हजार ४० रुपये किमतीचे २० लिटर डिझेल असे एकूण १ लाख ५५ हजार ४० रुपयांचे १५२० लिटर डिझेलचा साठा आढळून आला. अधिक चौकशी केली असता हा साठा गिरीश तुळशीराम बेलदार याचा असल्याचे समजले.
एकीकडे शेतकऱ्यांना शेतीकामासाठी डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्यामध्ये उद्रेक निर्माण झाला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून सचिन निकम यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून गिरीश बेलदार यांच्याविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ३ ,७ प्रमाणे तसेच भारतीय न्याय संहिता कलम २२३,२८७ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत.
