
मुख्तार खाटीक यांच्या विनंतीने प्रसूतीला दवाखान्यात जाणारी महिलेची वाट केली मोकळी
अमळनेर : वादळाने झाड पडले …आणि विप्रो बोगद्यातील वाहतूक बंद पडली …कायदा झाड बाजूला करू देत नव्हता …प्रसूतीला दवाखान्यात जाणारी महिला रस्त्यात अडकून पडली होती….अखेर माजी नगरसेवक मुख्तार खाटीक पुढे आले आणि त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून रस्ता मोकळा केला आणि सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.
जोराने वादळ आले आणि विप्रो कंपनीकडे जाणाऱ्या रेल्वे बोगद्यात झाड आडवे पडले. तांबेपुरा , सानेनगर , नन्दगाव , लडगाव , तासखेडा ,अंतुर्ली ,रंजाणे ,अंबारे , खापरखेडा , करणखेडा, मुडी ,दरेंगाव , हिंगोणे आदी गावांना जाणारा रस्ता बंद पडला. झाड रेल्वे हद्दीत असल्याने आर पी एफ हात लावू देत नव्हते. आणि मुळात विप्रो बोगदा हा रस्ता नव्हे हा नाला आहे त्यामुळे येथून वाहतूक करू नये असे फलक यापूर्वीच रेल्वे प्रशासनाने लावून ठेवल्याने रेल्वे प्रशासन झाड देखील हटवू देत नव्हते. हा नेहमीचा रस्ता असल्याने वाहतूक अडकली होती. पलीकडे एक महिला प्रसूतीसाठी जात असताना रस्त्यात अडकली होती. अखेर घटनेचे वृत्त कळताच माजी नगरसेवक मुख्तार खाटीक त्याठिकाणी आले. मात्र आर पी एफ यांनी विरोध केला. परिस्थितीचा विचार करून खाटीक यांनी रेल्वे प्रशासनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. विनंती करून झाड तोडायचा खर्च करून तुमच्या हद्दीतच झाड टाकतो मात्र झाड कापून रस्ता मोकळा करणे अत्यावश्यक आहे. दैनंदिन जीवनावर परिणाम होईल असे सांगून रेल्वे अधिकाऱ्यांचे मन वळवले. प्रशासनाला देखील माणुसकीचा पाझर फुटला आणि नियमात लवचिकता आणून गुलाम नबी यांच्याकडून झाड कापून रस्ता मोकळा केला. नागरिकांनी समाधान व्यक्त करत मुख्तार खाटीक यांचे आभार मानले.




