
Oplus_131072
सीसीटीव्ही बसविण्याबरोबरच मुख्य गेटच्या कामालाही वेग…
अमळनेर – अमळनेर येथील चोपडा रोडवरील अमरधाम स्मशानभूमीतील अपुऱ्या सुविधांमुळे अर्धवट जळालेल्या मृतदेहांची विटंबना होत असल्याबाबतची धक्कादायक बातमी विविध प्रसारमाध्यमामध्ये मंगळवारी प्रकाशित होताच नगरपरिषद प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या.
बातमीची गंभीर दखल घेत प्रशासनाने अमरधाम परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम हाती घेतले असून मुख्य प्रवेशद्वाराच्या बांधकामालाही वेग दिला आहे.बातमीत अंत्यसंस्कारासाठी अपुरे सरण, कर्मचाऱ्यांचा अभाव आणि भटक्या कुत्र्यांकडून अर्धवट जळालेल्या मृतदेहांची विटंबना होत असल्याचा मुद्दा ऐरणीवर आणण्यात आला होता. या वृत्तामुळे शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. नागरिकांसह लोकप्रतिनिधींनीही प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने मंगळवारीच अमरधाम परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया सुरू केली. तसेच मुख्य गेटचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. गेट पूर्ण होईपर्यंत तात्पुरती व्यवस्था करण्याच्या सूचनाही संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.याशिवाय स्मशानभूमीत कायमस्वरूपी कर्मचाऱ्याची नेमणूक करण्याबाबतही प्रशासनाने पावले उचलल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.अमरधामसारख्या संवेदनशील ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि मृतांचा सन्मान राखला जावा, हीच नागरिकांची अपेक्षा असून प्रसारमाध्यमांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची प्रशासनाने तातडीने दखल घेतल्याने या वृत्ताचा सकारात्मक परिणाम झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे.




