
सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात साजरा होत असून 13 ते 15 ऑगस्टपर्यंत हर घर झेंडा अभियान राबवले जाणार असून त्या पार्श्वभूमीवर देशभरात उसत्वाचे वातावरण असून पातोंडा ग्रामपंचायतीने देखील क्रांतिदिन व आदिवासी दिनाचे औचित्य साधत ग्राम पंचायतीच्या पटांगणात सामूहिक राष्ट्रगाण म्हणत अभियानाला सुरवात केली.
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होत असून केंद्र सरकारने देशभरात हे वर्षे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे.आणि देशभरातील भारतीयांना 13 ते 15 ऑगस्टला आपल्या घरावर झेंडा फडकविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन हर घर तिरंगा हे अभियान सुरू करण्यात आले आहे. येथील जिल्हा परिषदेच्या मुला व मुलींच्या शाळेत व श्री दत्त विद्या मंदिरात स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी झाली आहे. 9 ऑगस्ट हा दिवस देशभरात क्रांतिदिन व आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्या पार्श्वभूमीवर ग्राम पंचायतीने ग्राम पंचायतीच्या पटांगणात सामूहिक राष्ट्रगीताचे आयोजन करण्यात आले होते. त्यात जिल्हा परिषदे शाळेचे विद्यार्थी गणवेशात,श्री दत्त विद्या मंदिराचे विद्यार्थी, अंगणवाडीचे विद्यार्थी, सरपंच, ग्रामसेवक, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रा.पं. कर्मचारी, सहकारी संस्थाचे पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, उपशिक्षक, उपशिक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेवीका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकसुरात राष्ट्रगीत गाऊन भारत माता की जय अशा घोषणा दिल्या.
पातोंडा भाजपाकडून दि.10 रोजी बाईक रॅलीचे आयोजन…
पातोंडा भाजपकडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियान घराघरात पोहोचविण्यासाठी पातोंडा अमळगाव गटात बुधवार रोजी सकाळी 10 वाजेपासून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. रॅलीला ग्राम पंचायतपासून सुरवात होऊन पातोंडा अमळगाव गटात येणाऱ्या सर्व गावात ही बाईक रॅली झेंडे घेऊन निघणार आहे.सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सकाळी 10 वाजता पातोंडा ग्राम पंचायत जवळ जमून बाईक व झेंडा घेऊन येण्याचे आवाहन भाजप युवा जिल्हा उपाध्यक्ष घनश्याम पाटील यांनी केले आहे.







