
८२ वर्षापूर्वी नाटकांचे प्रयोग करून बांधले होते लाकडी दुमजली मंदिर…
संदिप लोहार
पातोंडा, ता.अमळनेर:- येथील प्राचीनकाळी शके १८६३ च्या काळातील कोरीव लाकडी श्री दत्त मंदिर नव्या रुपात साकारले जात,असून मंदिराचा कायापालट होणार आहे.

एकेकाळी गावाच्या बाहेर गांव दरवाजा होता.तिथे श्री मारोती मंदिर व गणपती मंदिर होते. तिथे त्या काळात गावाच्याच एका छत्रपती शिवाजी नाटक मंडळ या ऐतिहासिक नाटक कंपनीने दुमजली असे लाकडी श्री दत्त प्रभूंचे मंदिर बांधले.आज गावाच्या मध्यभागी प्राचीन दुमजली श्री दत्त मंदिर आहे. या मंदिरात स्वयंभू श्री दत्त प्रभूंची मूर्ती व श्री गणपती मूर्ती आहेत. मंदिराचा बहुसंख्य भाग सागवानी लाकडाचा असून त्यावर सुरेख बारीक कोरीव नक्षीकाम केलेले आहे. हे मंदिर शके १८६३ म्हणजे आज पासून ८२ वर्षांपूर्वी सन १९४० ला गावातील पूर्वजांनी तरुणपणात प्रपंच सांभाळत रात्रीच्या वेळी गावोगावी नाटकांचे प्रयोग करून आलेल्या मिळकतीतून स्वतःच्या हाताने मंदिर ऊभारले होते. विशेष म्हणजे पूर्वजांनी एवढी मेहनत घेऊनही एकाचे ही नाव कोरून अथवा पाटी लावली नाही. आशा निस्वार्थी भावनेने त्याकाळी हे मंदिर उभारण्यात आले होते. त्या पूर्वजांपैकी आज एकही माणूस हयात नाही. मात्र त्यांनी त्यावेळी केलेली निस्वार्थी सेवेने ते आजही गावातील लोकांच्या मनात घर करून बसले आहेत. हा पूर्वजांचा वारसा जतन राहावा या उद्देशाने गावातील श्री दक्षिणीमुखी हनुमान मंडळ, श्री दत्त भजनी मंडळ व दत्त विश्वस्थ मंडळ यांनी पुढाकार घेऊन नव्या रुपात मंदिर साकारून जीर्णोद्धार ठरवले आहे. त्यासाठी लागणारे मार्बल कोटींग, लाईट, कलर, रेडिमेट शनि मंदिर सह सर्वच साहित्य गावातील व सध्या नाशिक येथे स्थायिक सामाजिक कार्यकर्ते किरण विश्वासराव शिंदे (आबा शिंदे) यांनी दिले आहे. तर लोकवर्गणीतून कामाची मजुरी, वाळू, सिमेंटसह आदी खर्च देण्यात येत आहे. या कामासाठी लाखोंचा खर्च येत आहे. दत्त मंदिर व शनी मंदिराचे काम प्रगती पथावर सुरू आहे. कारागीर नाशिक, मुंबई, उत्तर प्रदेश, झारखंड आदी विविध राज्यांमधून मागवण्यात आले आहे. हे दोन्ही मंदिरे महिन्याच्या आत पूर्ण होणार असून त्यावेळी भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहेत. त्यानंतर लागून असलेला गाव दरवाज्यासह साऊथ पद्धतीचे भव्य असे श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर प्रस्तावित आहे.त्याचे ही काम काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे. नव्याने साकारण्यात येत असलेल्या श्री दत्त मंदिरात श्री दत्त प्रभूंचा जन्म सोहळा आयोजित करण्यात आला आहे.




