दोन्ही गटातर्फे एकमेकांविरुद्ध फिर्याद दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील सबगव्हाण येथे किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी होवून दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
प्रथम गटातर्फे देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी सुरेश वासुदेव पाटील हे दिनांक १५ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास भाऊ विश्वास याच्यासह अनिल संतोष पाटील यांच्या घरासमोर जावून आधी झालेल्या भांडणसंदर्भात समजावून सांगत असताना अनिल संतोष पाटील, राजेंद्र अनिल पाटील, स्वप्नील अनिल पाटील, भटू सदाशिव पाटील, अनिल पाटील यांचा शालक व शालकाचा मुलगा यांनी लाठ्याकाठ्या घेवून शिवीगाळ करत मारण्याचा प्रयत्न केल्याने पोलीसात वरील लोकांविरुद्ध फिर्याद दिली असून भादवि कलम १४३,१४७,१४८, ३२४,३२३, ५०४,५०६ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
दुसऱ्या गटातर्फे देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी अनिल संतोष पाटील यांच्या आदल्या दिवशी झालेल्या भांडणाच्या वादातून विश्वास वासुदेव पाटील, सागर वासुदेव पाटील, बाळासाहेब विश्वास पाटील, सुरेश वासुदेव पाटील, गणेश सुरेश पाटील यांनी घरावर दगड फेकून मारले. लाता मारत घराचा दरवाजा उघडून सामान फेकले. तसेच मोठा मुलगा राजेंद्र यास लाठ्याकाठ्यांनी मारहाण करू लागले. यावेळी त्यास वाचाविण्यास गेलेल्या फिर्यादी त्यांची पत्नी व लहान मुलास देखील मारहाण केली. त्यावरून मारवड पोलिसात दाखल तक्रारीनुसार भादवि कलम १४३, १४७, १४८, ४५२, ३३७, ३२४, ३२३, ४२७, ५०४, ५०६ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दोन्ही घटनांचा पुढील तपास पो. उ. नि. बाळकृष्ण शिंदे हे करीत आहेत.