
आगारप्रमुखांनी कर्मचारी पाठवल्यानंतर बळजबरीने थांबवली बस…
अमळनेर:- पाच किमी पायी चालल्यानंतर मंगरूळ येथील विद्यार्थिनींना काल सकाळी पुन्हा सव्वा तीन तास बससाठी प्रतीक्षा करावी लागली. आगार प्रमुखांनी प्रत्यक्ष एक कर्मचारी मंगरूळला पाठवल्यानंतर बळजबरीने बस थांबवून मुलींना प्रवेश दिल्याचा प्रकार दिनांक २० रोजी सव्वा दहा वाजता घडला.

तालुक्यातील मंगरूळ येथील काही महाविद्यालयीन विद्यार्थिनी २० रोजी सकाळी सात वाजता महाविद्यालयात जाण्यासाठी मंगरूळ येथे बस स्टॉपवर थांबल्या होत्या. धुळ्याकडून येणाऱ्या जवखेडा, सोनगीर, अंचलवाडी येथून येणाऱ्या बसेस थांबत नसल्याने विद्यार्थिनी त्रस्त झाल्या होत्या. चार दिवसांपूर्वी देखील विद्यार्थिनींना पाच किमी पायी जावे लागले होते. विद्यार्थिनींनी आधी आगारप्रमुख इम्रानखान पठाण यांच्याशी संपर्क साधला. चालक वाहक यांना सूचना दिल्यानंतरही अंमलबजावणी होत नसल्याने संतप्त झालेल्या आगार व्यवस्थापकांनी विद्यार्थिनींच्या सोयीसाठी एक एसटी कर्मचारी खास मंगरूळ येथे पाठवून विद्यार्थिनींना बसमध्ये प्रवेश देण्याचे आदेश दिले. सकाळी सव्वा तीन तासांपासून विद्यार्थिनी बस स्टॉपवर थांबलेल्या असल्याचे लक्षात येताच या कर्मचाऱ्याने मंगरूळजवळ बस येताच बस थांबवून विद्यार्थिनींना बसमध्ये प्रवेश दिला. त्यानंतर विद्यार्थिनींनी मंत्री अनिल पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन आपली व्यथा मांडली. अनिल पाटील यांनी विद्यार्थिनींची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या अन्यथा संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करा असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत.
प्रतिक्रिया…
सतत दोन तीन दिवस एक विशेष कर्मचारी मंगरूळ बस स्टॉपवर उभा करून बस न थांबणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
:-इम्रानखान पठाण, आगार व्यवस्थापक, अमळनेर




