
खुल्या भूखंडामध्ये मोठ्या प्रमाणात डबके साचल्याने डासांचे प्रमाण वाढले…
अमळनेर:- तालुक्यात ४ जणांना डेंग्यू आणि अनेक बालकांना व्हायरल विषाणू तापाची लागण झाल्याने शहराचे आरोग्य बिघडले आहे. खुल्या भूखंडामध्ये मोठ्या प्रमाणात डबके आणि तळे साचल्याने डास कीटकांचे प्रमाण वाढले आहे.

गेल्या पाच सहा दिवसांपूर्वी पाऊस झाल्याने शहरात ढेकू रोड, पिंपळे रोड परिसरात अनेक ठिकाणी पालिकेचे खुले भुखंड , नागरीकांचे रिकामे प्लॉट यात पाणी साचून राहिलेले आहे. आधीच अशा रिकाम्या जागेत गवत, लहान झुडुपे वाढल्याने साप, विषारी कीटकांची भीती पसरली आहे. पाणी साचून राहिल्याने दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच पिंपळे रोडला स्वामी विवेकानंद नगर मध्ये भुयारी गटारीचे दूषित पाणी पिण्याच्या पाईपलाईनच्या व्हॉल्वच्या खड्ड्यामध्ये गेल्याने नागरिक संतप्त झाले होते. नळाला पाणी आल्यावर मोटारी लावताच व्हॉल्व मधून साचलेले पाणी शोषले जात असल्याने आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
शहरात पिंपळे रोडवरील द्वारकानगरमध्ये ३१ वर्षाचा इसम, ख्वाजानगर मधील ५ महिन्याची मुलगी, गजानन नगर ११ वर्षांची मुलगी, टाकरखेडा येथे ९ वर्षांचा मुलगा यांना डेंग्यूची लागण झाली आहे. तर दोन रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गिरीश गोसावी यांनी दिली आहे.
“सध्या व्हायरल विषाणूची लागण झाल्याने बालकांमध्ये सर्दी, तापाची लागण झाली असून सरासरी दररोज ४० रुग्ण रुग्णालयात येत आहेत.” – डॉ जी एम पाटील, बालरोगतज्ञ ग्रामीण रुग्णालय, अमळनेर
“शहरात पालिकेने १९० घरांची तपासणी केली असून ४७६ कंटेनर तपासण्यात आले आहेत. ५३ कंटेनर मध्ये डेंग्यूच्या डासाच्या अळ्या आढळून आल्या”. :- डॉ विलास महाजन, वैद्यकीय अधिकारी, नगरपालिका अमळनेर




