
सभापती अशोक पाटील यांच्याकडून १ लाख रुद्राक्षांचे मोफत वाटप…
अमळनेर:- कृषी उत्पन्न बाजार समितीतील गणेशोत्सवात सभापती अशोक आधार पाटील यांनी तालुक्यातील सर्व भक्तांसाठी तब्बल १ लाख रुद्राक्ष प्रसाद म्हणून मोफत वाटायला सुरुवात केली आहे. यामुळे बाजार समितीत मोठया प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असून भक्तिमय वातावरण तयार झाले आहे.

दरवर्षी अमळनेर बाजार समितीत गणेशोत्सवाचे वेगळेच आकर्षण असते. राजकीय नेते, व्यापारी, हमाल मापाडी, कर्मचारी, आडते, शेतकरी अशा सर्व स्तरातील भक्तांचा संगम होवून अतिशय आनंदात हा उत्सव साजरा केला जातो. सध्या जनतेची भक्ती महादेवाकडे वळल्यामुळे भक्तीच्या प्रवाहात जात बाजार समिती गणेशोत्सव मंडळाने १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक केदारनाथ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती उभारली आहे. यामुळे भक्तांना गणेशाच्या दर्शनासह शिवपिंडीचेही दर्शन होणार आहे. या भक्तीत भर पडावी म्हणून सभापती अशोक पाटील यांनी अमळनेर तालुक्यातील भक्तांसाठी मोफत प्रसाद म्हणून सीहोर येथून एक लाख रुद्राक्ष मागवून घेतले आहेत. प्रसाद म्हणून रुद्राक्ष वाटप होत असल्याने भक्तांची गर्दी वाढली आहे. दररोज सरासरी ५ ते ६ हजार भक्त दर्शनासाठी व रुद्राक्षाचा प्रसाद घेण्यासाठी बाजार समितीत येत आहेत.





