
उत्कृष्ट गणेश मंडळांना सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात येणार…
अमळनेर:- तालुक्यात १९४ सार्वजनिक व खाजगी गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. त्यापैकी २१ ठिकाणी एक गाव एक गणपती स्थापन करण्यात आले आहेत. काल प्रशासनातर्फे मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यात आली.

अमळनेर पोलीस स्टेशन अंतर्गत १५७ गणेश मंडळे असून त्यात ७ खाजगी, ७ एक गाव एक गणपती व उर्वरित १४३ सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. पाचव्या दिवशी ७ गणपती मंडळाचे विसर्जन झाले. सहाव्या दिवशी १, सातव्या दिवशी १२, ८ व्या दिवशी १६, नवव्या दिवशी ५० आणि अनंत चतुर्दशीला ७२ गणेश मंडळाचे विसर्जन होणार आहे.
अमळनेर पोलीस स्टेशन अंतर्गत संवेदनशील व संमिश्र वस्तीतून १९ गणेश मंडळ जातील, तर ६ गणेश मंडळांची स्थापना संवेदनशील भागात आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी १ राज्य राखीव पोलीस दल, २ दंगा नियंत्रण पथक, स्टॅकिंग फोर्स, ८ अधिकारी, ७२ पोलीस आणि १०० होमगार्ड आणि वाद्यांचे डेसीबल मीटर असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मारवड पोलीस स्टेशन अंतर्गत ३७ गणेश मंडळे आहेत. त्यात २३ सार्वजनिक व १४ एक गाव एक गणपती स्थापन करण्यात आले आहेत. विसर्जनासाठी ३ अधिकारी,२२ कर्मचारी व २३ होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.
उत्कृष्ट गणेश मंडळांचा होणार सन्मान…
शहरातील मुंदडा बिल्डर्स, अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ, नगरपरिषद व पोलीस प्रशासनातर्फे शिस्तीत मिरवणूक काढणारे, गुलाल न उधळणारे, सामाजिक दृष्टिकोनातून आरास ठेवणारे, देशभक्ती रुजवणाऱ्या उत्कृष्ट गणेश मंडळांना दगडी दरवाज्याच्या बाहेर मिरवणूकीच्या अंतिम ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
प्रशासनातर्फे मिरवणूक मार्गाची पाहणी…
उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, पोलीस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक विजय शिंदे , मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, सहाययक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, संजय चौधरी आदींनी शहरातील विसर्जन मिरवणुकीचा मार्गाची पाहणी केली व संवेदनशील स्थळाजवल जादा पोलीस कुमक, गोपनीय पोलीस आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ठिकठिकाणी गणेश विसर्जन करताना बॅरिकेट्स व घ्यायची काळजी आणि चोख बंदोबस्त, संकलन केंद्राची जागा निश्चिती करण्यात आली.





