
प्रसंगावधान राखत चालकाने जागेवर ब्रेक मारल्याने बस खड्ड्यात जाता जाता बचावली…
खोदकामाची परवानगी नाही, तरी माती टाकून चांगल्या रस्त्याचा केला सत्यानाश…
अमळनेर:- तालुक्यातील कळमसरे तांदळी रस्त्यावर फायबर केबल टाकण्यासाठी रस्त्याच्या बाजूला जेसीबीने चारी खोदून माती रस्त्यावर टाकल्याने एसटी बस चिखलात घसरून खड्ड्यात जाता जाता बचावल्याची घटना काल दिनांक २७ रोजी पहाटे घडली आहे.

तालुक्यातील कळमसरे तांदळी रस्त्याच्या कडेला चारी खोदून एअरटेल कंपनीकडून फायबर केबल टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र खोदकाम केलेली माती रस्त्यावर टाकल्याने एका बाजूने वाहतूक सुरू होती. परवा पाऊस झाल्याने ढीगाऱ्याच्या मातीमुळे रस्त्यावर चिखल पसरला होता. दिनांक २७ रोजी सकाळी ८ वाजता शिरपूर कडे जाणारी बस रस्त्यावर माती असल्यामुळे कडेकडेने जात असताना अचानक रस्त्याच्या कडेला घसरू लागल्याने चालकाने प्रसंगावधान राखत ब्रेक मारून गाडी जागेवरच थांबवली. त्यामुळे गाडीत असलेल्या प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडत चालक किरण धनगर व वाहक चौधरी यांचे आभार मानले. मात्र मागील चाक चिखलात रुतून बसल्याने तब्बल दोन तास बस त्याच ठिकाणी थांबून होती. त्यानंतर जेसीबी मागवून रस्त्यावरचा मातीचा ढिगारा बाजूला करून बस काढण्यात आली. व दोन तासांनी बस रवाना झाली. मात्र प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला.
माती टाकून सुस्थितीत असलेल्या रस्त्याचा केला सत्यानाश…
कळमसरे ते तांदळी असा पाच किमी अंतर असलेला रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत काही वर्षापूर्वीच बांधण्यात आला असून पूर्ण रस्ता सुस्थितीत होता. एअरटेल कंपनीचे फायबर केबल टाकण्यासाठी शिरपूर येथील एकाला सब कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. त्याने जेसीबीच्या सहायाने रस्त्याच्या अगदी बाजूलाच चारी खोदत त्याची माती रस्त्यावर टाकली त्यामुळे अर्धाअधिक रस्ता मातीच्या ढिगाऱ्याने व्यापला होता. आणि पावसामुळे त्याचा चिखल ही झाला होता. सकाळी बस फसल्यानंतर सदर जेसीबीने हे मातीचे ढिगारे बाजूला केले तरी त्यामुळे सुस्थितीत असलेला रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. कडेलाचा कोरल्यामुळे साईड पट्टीची माती भुसभुशीत झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहने फसण्याच्या व घसरण्याच्या घटना घडू शकतात. याच रस्त्यावरून परिसरातील नागरिकांचे पूर्णपणे रहदारी असून ह्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने स्वप्नील परदेशी, कपिल पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. तसेच रस्ता सुस्थितीत न करून दिल्यास आंदोलनाचा इशारा ही दिला आहे.
विनापरवानगी काम केल्याने संबंधित यंत्रणा कारवाई करणार का ???
सदरची घटना झाल्यानंतर केबल टाकण्याचे काम करणाऱ्या संबंधितांना परवानगीचे कागद मागितले असता त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे व परवानगी नसल्याचे लक्षात आले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे शाखा अभियंता विवेक पाटील यांनी सहायक शाम पाटील यांना घटनास्थळी पाठवून रस्त्याची पाहणी केली. व रस्त्यावरील माती बाजूला करून रस्ता सुस्थितीत करून द्या अश्या सूचना केल्या. मात्र परवानगी नसली तरी दोन कोटीच्या चांगल्या रस्त्याचा सत्यानाश करणाऱ्यांवर संबंधित यंत्रणा काही ठोस कारवाई करणार आहे का ? असा प्रश्न विचारला जात आहे.
प्रतिक्रिया…
संबंधितांनी विना परवानगी हे काम सुरू केले असून त्यांच्याकडून रस्ता पूर्वस्थितीत करून घेतला जाणार आहे. तसेच पट्ट्याची ही दुरुस्ती करून घेण्यात येईल.
:- विवेक पाटील, शाखा अभियंता, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना




