
अमळनेर व एरंडोल नगर पालिकेची घंटागाडीवर क्लिप वाजून जनजागृती…
अमळनेर:- येथील निवृत्त तहसीलदार सुदाम महाजन यांनी स्वतः पदर मोड करून तयार केले मतदार जागृती अहिराणी गीत जळगांव, अमळनेर आणि एरंडोल नगर पालिकेच्या घंटागाडीवर वाजवले जात आहे. यातून जनजागृती होण्यास मोठी मदत मिळत असून त्याची व्यापकता अजून वाढल्यास त्याचा प्रशासनास अधिक मदत होऊ शकते.

आगामी होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी शासनाने मतदार यादी परीक्षण, नवे मतदार समाविष्ट करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. निवृत्त तहसीलदार महाजन यांनी हे गीत अहिराणी भाषेतून म्हटले आहे. गीताला संगीत व ध्वनी मुद्रण दोंडाईचा येथील एकनाथ मराठे यांचे आहे. सुदाम महाजन यांच्या समवेत सुनीता माळी यांचे संवाद आहेत. या गीतातून पती पत्नीला सांगतो की काय डोळे लावून बसले आपली मुलगी अठरा वर्षांची झाली. त्यावेळी पत्नीला मुलीचे लग्न करावे लागेल अशी चिंता वाटते. त्यावर पती तिच्यावर रागावतो आणि म्हणतो की नाही तिच्या आयुष्याचा जोडीदार निवडण्यापूर्वी तिचे नाव मतदार यादीत टाकावे लागेल. तिला देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी तिला मतदार करून नेता निवडण्याचा अधिकार द्यावा लागेल मग तिचे लग्न करावे लागेल. आपला मुलगा व मुलगी अठरा वर्षाची झाली की त्यांचे नाव मतदार यादीत टाका. असे आवाहन अहिराणी भाषेतून करण्यात आले आहे.
सार्वजनिक ठिकाणी गाणे वाजवल्यास अधिक जागृती…
सुदाम महाजन यांचे हे मतदार जागृती गीत जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील सर्वच ग्राम पंचायत , नगरपालिका महापालिकांच्या घंटा गाड्यांवर तसेच बसस्थानक, रेल्वे स्टेशन, शाळा, महाविद्यालये चित्रपट गृह, मॉल,पेट्रोल पंप आदी सार्वजनिक ठिकाणी ही क्लिप वाजवल्यास अधिक जागृती होण्यास मदत होईल.
सकाळी “काय डोया लाई बसनात” कानावर पडताच मिळाला सुखद धक्का…
२५ रोजी रात्री अमळनेरला गणपतीच्या आरती निमित्त मुक्कामी आलो होतो आणि सकाळी उठल्यावर स्वतच्या आवाजाची क्लिप घंटागाडीवर ऐकल्यावर मला जाग आली आणि आश्चर्याचा अन् आनंदाचा सुखद धक्का बसला. सदर क्लिप ही मी शासनाच्या सेवेसाठी, शासनाची कोणतीही यंत्रणा न वापरता आणि कोणतेही मानधन किंवा आर्थिक स्वरूपाची मदत न घेता पदर मोड करून तयार केलेली आहे.
:- सुदाम महाजन, सेवानिवृत्त तहसीलदार




