
महत्वाचे कॉर्नर, संवेदनशील भागात जादा कुमक व कॅमेऱ्याची नजर…
अमळनेर:- दहा दिवसांपासून मुक्कामाला असलेल्या गणरायाच्या विसर्जनासाठी प्रशासन सज्ज असून सुमारे ६०० कर्मचारी बंदोबस्त व मूर्ती संकलनासाठी तैनात करण्यात आले आहेत.

शहरातील धुळे रस्त्याकडून, सुभाष चौकातून, कुंटे रोडवरून , सराफ बाजरातून, राणी लक्ष्मीबाई चौकातून येणारे सर्व गणपती मिरवणुका दगडी दरवाज्याजवळ थांबतात. अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, डीवायएसपी सुनील नंदवाळकर, चोपड्याचे डीवायएसपी कृषिकेश रावळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्यासह १६ अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली ४५० पोलीस कर्मचारी, १५० पुरुष होमगार्ड, ५० महिला होमगार्ड, दोन एसआरपी पथक, दोन दंगा काबू पथक, दोन स्टॅकिंग फोर्स, १० एलसीबी पोलीस असा बंदोबस्त विसर्जनासाठी तैनात आहे.
शहरातील काही चौक आणि महत्वाचे कॉर्नर, संवेदनशील भागात जादा कुमक व कॅमेऱ्याची नजर असणार आहे. त्यात सुभाष चौक, सराफ बाजार, कसाली मोहल्ला, पानखिडकी,जैन मंदिर , बाहेरपुरा, अंदरपुरा, मशीद, झामी चौक या स्थळांचा समावेश आहे.
मंगळ ग्रह मंदिराजवळ तलावात, सावखेडा येथे तापी नदीत, आश्रमशाळेजवळ, तसेच तेल्या मारुतीजवळ विसर्जन करण्यात येणार आहे. तसेच फरशी रोड, ढेकू रोड वरील शक्ती भक्ती केंद्राजवळ, वाडी संस्थान, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह आदी ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र ठेवण्यात येणार आहे.




