नाले ओलांडत प्रवास करावा लागत असल्याने शेतकऱ्यांचा जीव कायमच टांगणीला…
अमळनेर:- गेल्या अनेक वर्षांपासून कलाली येथील शेतकऱ्यांना शेतातून माल नेआण करण्यासाठी चिखलाचा रस्ता असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला बळी पडावे लागत आहे त्यामुळे शेतीसाठी तरी रस्ता द्या अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
कलाली येथील कोल्ही शिवारात सुमारे १०० शेतकऱ्यांची ४०० एकर बागायती शेती असून तापी नदी काठावर खोऱ्यात ही शेती असल्याने उत्पन्न चांगले येते. मात्र या शेतातून मालने आण करण्यासाठी एकच रस्ता आहे. तीन किमी रस्ता असा आहे की यावर खैऱ्या व लेंढ्या असे दोन मोठे व सात ते आठ लहान नाले आहेत. तापी काठावरील चिकन मातीमुळे या रस्त्यावर जून ते डिसेंबर महिन्यापर्यंत दोन ते तीन फुटापर्यंत गारा चिखल झालेला असतो. शेतातून एक ट्रॅक्टर माल काढून आणण्यासाठी पुढे ओढणारे दोन ट्रॅक्टर लागतात. तरी शेतकऱ्यांना कसरत करावी लागते. विशेष म्हणजे या रस्त्यावरून एकावेळी एकच वाहन प्रवास करू शकत असल्याने शेतकऱ्यांना शेतात वाहने नेआण करण्यासाठी रस्त्यात सूचना देण्यासाठी माणसे ठेवावी लागतात. एकीकडून वाहन येत असताना समोरून वाहन आले तर वाहन मागे घेणे अवघड असते त्यामुळे पूर्वसूचना देण्यासाठी आवाज द्यावा लागतो की एकीकडून वाहन येत आहे.
या परिसरात शेतकरी केळी, कापूस,पपई अशी बागायती पिके घेतात. मात्र सप्टेंबर पूर्वी माल ने आण करताना हाल होऊ नयेत म्हणून ते उशिरा लागवड करतात. परंतु त्यामुळे त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होतात. तसेच मालाला उशिरा भाव मिळत नाही. काढलेला माल शेतातून घरी किंवा बाजारात नेण्यासाठी ३०-३५ टक्के फक्त वाहतूक खर्च येतो. शेतकऱ्यांनी चिखलात ट्रॅक्टर चालावेत म्हणून फोरव्हील ट्रॅक्टर घेतले आहेत. तरी देखील मालाने भरलेले ट्रॅक्टर फसतात आणि बाहेर काढण्यासाठी इतर दोन तीन ट्रॅक्टरचा सहारा घ्यावा लागतो. डिसेंबर नंतरही रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर धूळ साचलेली असते.
या परिसरातील शेतकऱ्यांनी अनेकवेळा शेतरस्त्याची मागणी केली. मात्र गाव निम्न तापी प्रकल्पात अंशतः बुडीत होणार असल्याने शासन रस्ता करून देत नाही. हा रस्ता केला असता तर सात्री गावाला देखील पर्यायी रस्ता उपलब्ध झाला असता आणि शेतकऱ्यांची ही सोय झाली असती. राजकीय नेते व अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे शासनाने कुठलेही अनुदान, पीक विमा अथवा कर्जमाफी देऊ नका मात्र आम्हाला शेतातील माल नेआण करण्यासाठी रस्ता द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
अवघ्या १०० मीटर अंतरावर तापी नदी असल्याने या रस्त्यावरील नाल्यातून शेतकरी शालिग्राम दशरथ देशमुख वाहून गेले होते. त्यांचे प्रेतही सापडले नव्हते. तीन जणांना वाहून जाताना वाचवण्यात आले आहे. सुमारे १० गुरे देखील वाहून गेले आहेत.
प्रतिक्रिया…
४०० एकर शेतीसाठी असलेला तीन किमीचा रस्ता बुडीत क्षेत्रात येणार आहे. आणि गाव जसेच्या तसे राहणार आहे. हा रस्ताही गेला तर शेती कशी करावी ? – विनोद गुलाबराव पाटील, चेअरमन, विकासो कलाली
प्रतिक्रिया…
अमळनेर नगरपरिषदेची पाणी पुरवठा योजना कलाली येथून सुरू करण्यासाठी पंप हाऊसला स्वतःची जागा मोफत दिली. त्यावेळी शेतकऱ्यांसाठी पर्यायी रस्ता बनवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. ते आजपर्यंत पाळण्यात आले नाही.
–राहुल भागवत पाटील, शेतकरी, कलाली