एप्रिल महिन्यात झाला होता तरूणाचा संशयास्पद मृत्यू…
अमळनेर:- एप्रिल महिन्यात दुर्घटना होऊन तरुणाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने दहिवद येथील एकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील दहिवद खुर्द येथील प्रवीण पांडुरंग पाटील याला २२ एप्रिल २०२३ रोजी रात्री नऊ वाजता त्याचा मित्र अशोक उर्फ रिंकू प्रकाश पाटील (वय २८) याने मोटरसायकलवर बसवून बाहेर नेले होते. २३ एप्रिल रोजी सकाळी प्रवीण याचे प्रेत लोणे भोणे फाट्याजवळ लेंडी नाल्यात आढळून आले होते. त्यांच्या अंगावर, डोक्यावर, डाव्या बाजूस कपाळावर, दाढीवर, मांडीवर, उजव्या गुडग्यावर, छातीवर जखमा आढळून आल्या होत्या. घटनास्थळी पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी भेट दिली होती. त्याचा संशयित मृत्यू झाल्याने प्रवीणची आई व नातेवाईकांनी आरोपीला अटक करण्याची मागणी केली होती. प्रवीण २३ रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत घरी आला नव्हता म्हणून आई इंदूबाई पांडुरंग पाटील हिने गणेश श्रीराम पाटील यांच्या फोनवरून मुलाबाबत अशोक उर्फ रिंकुला चौकशी केली असता त्याने फोन बंद करून घेतला होता. त्यामुळे आईचा संशय बळावला होता. प्रवीण पुलावरून खाली नाल्यात पडल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. प्रवीणची आई इंदूबाई व नातेवाईकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व एलसीबी पथकाच्या भेटी घेऊन रिंकू वर संशय व्यक्त केला होता. अखेर इंदूबाई यांनी न्यायालयात धाव घेतली व न्यायालयात युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने १५६(३) प्रमाणे रिंकू उर्फ अशोक याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर अमळनेर पोलीस स्टेशनला भादवि कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत आहेत.