
अमळनेर:- काळ बदलत चालला तशा आता सर्वच ठिकाणी महिलांना संधी देण्यात येते. पती गेले, एकुलता एक मुलगाही गेला म्हणून अखेर आजीबाईना नातीनेच अग्निडाग देऊन समाजापुढे आदर्श घालून दिला.

जानवे येथील लक्ष्मीबाई भटू पाटील (वय ८५) या गेल्या चार वर्षांपासून कर्करोगाने अंथरुणावर खिळल्या होत्या. त्या मृत्यूची वाट पाहत असताना दोन वर्षांपूर्वी मुलगा दीर्घ आजाराने जग सोडून गेला. लक्ष्मीबाईला हे दुःख कमी होते की काय म्हणून एक वर्षांपूर्वी पतीही सोडून गेले. सुन सीमा पाटील यांनी त्यांची सेवा केली. ३० सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता लक्ष्मीबाई चे निधन झाले. लक्ष्मीबाईना पाच मुली, नातू, नात सून असा परिवार आहे. नातू बाहेरगावी शिक्षणाला असल्याने येऊ शकला नाही. सर्वसाधारणपणे मुलबाळ नसलेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी पुतण्या, नातू याना बोलावण्यात येते. मुली स्मशानात जात नाहीत या पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन नात ‛तेजस्विनी’ लाच अग्निडाग देण्यासाठी तयार करण्यात आले. तेजस्विनीने आपली आजी लक्ष्मीबाईला अग्निडाग देत जलदानही केले. रूढी परंपरांना फाटा देऊन मुलीच्या हातून अग्निडाग आणि जलदान केल्याने नवीन पायंड्याचे सर्वांनी स्वागत केले.




