
ग्रामीण भागातील पाच तर शहरी भागातील दोन शाळांची निवड…
अमळनेर:- आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे यांच्या संकल्पनेतून “डॉ.कलाम विज्ञान फिरती प्रयोगशाळा” ही मोबाईल व्हॅन तयार करण्यात आली आहे. यात सुमारे 40 पेक्षा जास्त विविध विज्ञानाचे प्रयोग साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. विज्ञानाच्या संकल्पना विद्यार्थ्यांना नीट समजाव्यात यासाठी या व्हॅन मध्ये ‘एलईडी टीव्ही’ ही लावण्यात आला आहे. सुरुवातीला ग्रामीण भागातील पाच तर शहरी भागातील दोन शाळांची निवड करण्यात आली आहे. या मोबाईल व्हॅन चा लोकार्पण सोहळा हा दिवाळी नंतर होणार असला तरी तालुक्यातील सात शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ही व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात या मोबाईल व्हॅनचे स्वागत करण्यात आले.

“मारवड परिसर विकास मंच”च्या माध्यमातून मिलके चलो असोसिएशनची टीम विविध शाळांमध्ये या मोबाईल व्हॅनमधून विज्ञानाचा प्रचार प्रसार करणार आहेत. यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या गायत्री भदाणे अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी मिलके चलो असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, संचालक कल्याणी पाटील, विनायक पाटील, गोपाल गावंडे आदींनी फिरत्या प्रयोगशाळे बाबत सखोल मार्गदर्शन करून मोबाईल व्हॅन मधील प्रयोगांची मांडणी करून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके करून दाखवली. यावेळी जेष्ठ शिक्षिका कल्पना महंत, व्ही सी पाटील, एन बी खंडारे, जी पी हडपे, उमेश काटे, दीपक पाटील, लता पवार, नीलिमा पाटील, सुनील पाटील, सुनील साळुंखे, एस एस पाटील, नितीन पाटील, कल्याण नेरकर, किरण पाटील, आर आर पाटील, रुपाली पाटील, दिलीप मनुरे, सतीश बाविस्कर, प्रवीण उशीर, सुरेश पाटील आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेश काटे यांनी सूत्रसंचालन केले.
पातोंडा विद्यालयातही स्वागत…
पातोंडा येथील श्री दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात या फिरत्या प्रयोगशाळा या मोबाईल व्हॅनचे स्वागत करण्यात आले. नागपूर प्राधिकरणाचे उपसंचालक कपिल पवार, शिवाजी शिक्षण मंडळाचे चेअरमन विनायक बिरारी, संचालक लोटन बिरारी, सुनील पवार, निवृत्त प्राचार्य मगन सूर्यवंशी, मिलके चलो असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, संचालक कल्याणी पाटील, सिद्धार्थ पाटील, विनायक पाटील, चेतन वैराळे, वैष्णवी ठाकरे, सुनील पाटील, तालुका गणित मंडळाचे अध्यक्ष डी ए धनगर, तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष निरंजन पेंढारे, साने गुरुजी शैक्षणिक विचार मंचचे दत्तात्रय सोनवणे, उपक्रमशील शिक्षक चंद्रकांत पाटील, शिवशाही फाउंडेशनचे सचिव उमेश काटे, विज्ञान शिक्षक विजय मोरे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रा जयदीप साळी, ज्येष्ठ नागरिक प्रकाश पाटील आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी पोलीस म्हणून निवड झालेले सतीश महाजन व गणेश पारधी या दोघांचा आई-वडिलांसह मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. अनिरुद्ध पाटील यांनी या फिरत्या प्रयोगशाळेबाबत सखोल मार्गदर्शन केले. प्रा भूषण बिरारी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्राचार्य प्रदीप शिंगाने, पर्यवेक्षक व्ही सी पाटील, प्रदीप लोहारे, महेंद्र पाटील, अमित पवार आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीला मिळणार वाव…
सद्यस्थितीत अनेक माध्यमिक व प्राथमिक शाळांमध्ये प्रयोगशाळांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी प्रयोगांचे साहित्य धुळखात पडले आहे. तर काही शाळांमध्ये प्रयोगशाळाच नसल्याचे चित्र आहे. केवळ बोटावर मोजणे इतक्या शाळांमध्येच प्रयोगशाळांच्या माध्यमातून काम सुरू आहे. या फिरत्या प्रयोगशाळेमुळे एक नवसंजीवनी निर्माण होणार आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण होऊन संशोधक वृत्तीला वाव मिळणार आहे. पर्यायाने भविष्यात निश्चितच बाल वैज्ञानिक निर्माण होतील यात तिळमात्र शंका नाही. दरम्यान लोकार्पण होण्यापूर्वीच ही मोबाईल व्हॅन विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.




