
सोमवारी सकाळी विश्रामगृहापासून निघणार पायी मोर्चा…
अमळनेर:- शहरातील नागरिक अनेक समस्यांमूळे त्रस्त झाले असून या समस्यांना वाचा फोडण्यासाठी सोमवारी अमळनेर नगरपरिषदेवर पायी मोर्चा काढण्यात येणार आहे.

शहरात अनेक वर्षांपासून भुयारी गटारीचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे चांगल्या रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून जनतेला खराब रस्त्यामुळे यातना सहन कराव्या लागत आहेत. निवडणुका झाल्या नसल्याने नगरसेवकांअभावी एकट्या मुख्याधिकारी यांचा मनमानी कारभार सुरू असून मूलभूत नागरी सुविधांकडे संपूर्ण दुर्लक्ष आहे. गावांत डुकरे, कुत्रे ह्यांचा सुळसुळाट आहे. उघड्यावर मास, मच्छी विकली जाते. अनेक कॉलनीमध्ये दिवाबत्ती गुल असते. तापी नदीला महापूर आलेला असतानाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असतो. पाणी सोडण्याच्या वेळेचे नियोजन नाही. अशा अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महा विकास आघाडी व त्रस्त नागरिक आघाडी तर्फे सोमवार दि.०९ रोजी जि.प. विश्रामगृहापासुन सकाळी ११ वाजता नगरपरिषदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याठिकाणी नागरिकांनी हजारोंच्या संख्येने हजर राहावे. असे आवाहन माजी आ.डॉ. बी.एस. पाटील, नागरी समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष श्याम पाटील, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मनोज पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख सूरज परदेशी, आपचे अध्यक्ष संतोष पाटील, बीआरएसचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी केले आहे.




