
आमसभा घेण्याबाबत सचिन पाटील व अनंत निकम यांचे बीडीओंना निवेदन…
अमळनेर:- तालुक्यात सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या शासकीय कार्यालयात प्रलंबित असून पाच वर्षांपासून आमसभा झालेली नाही ती घेण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष सचिन पाटील व शिवसेना (उबाठा) उपशहर प्रमुख अनंत निकम यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.

शासकीय कार्यालयात शेतकऱ्यांना चकरा माराव्या लागतात, तालुक्यात उपचारअभावी सर्प दंशाने अनेकांचा मृत्यू झाला आहे, ग्रामीण भागातील गाडवाट, पायवाट, शेती बांधावरून वाद, अतिक्रमण याबाबत वेळेवर न्याय मिळत नाही म्हणून भाऊबंदकीत वाद होत आहेत. शहरात काही ठिकणी रस्त्यांवर रस्ते होत आहेत इतरत्र मात्र खड्डे आहेत. कृषी खात्यात विविध अनुदानित योजनांमध्ये तफावत आढळून येत आहे. २०२१ पासून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीबाबत अनुदान मिळालेले नाही. आमसभा हे सामान्य जनतेचे व्यासपीठ असून त्यातून नागरिकांच्या समस्या सुटतात म्हणून तालुक्याची आमसभा घेण्यात यावी अशी मागणी सचिन पाटील व अनंत निकम यांनी निवेदनाद्वारे केली आहे.




