
निवेदन देत समस्यांचे निराकरण करण्याची मागणी, अन्यथा उपोषणाचा इशारा…
अमळनेर:- प्रशासक काळात अमळनेर नगरपरिषदेच्या भोंगळ कारभाराने नागरिक त्रस्त असून त्याविरोधात काल मविआ व त्रस्त नागरिकांनी नगरपरिषदेवर पायी मोर्चा काढत प्रशासक मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदन देत लवकर प्रश्न न सुटल्यास उपोषण आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा दिला.

महाविकास आघाडी आणि त्रस्त नागरिक आघाडीकडून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बी. एस पाटील यांच्या नेतृत्वात विश्राम गृहापासून सुरू झालेला मोर्चा बस स्टॅन्ड, भागवत रोड, बाजारातून, लालबाग शॉपिंग, सुभाष चौक, स्टेशन रोड मार्गे नगरपालिकेवर धडकला. यावेळी मोर्चेकऱ्यांच्या वतीने प्रमुख वक्ते माजी आमदार डॉ. बी.एस पाटील, यांचेसह सचिन बाळू पाटील, अनंत निकम, रणजित शिंदे, सुभाष चौधरी, रिता बाविस्कर, मनिषा परब यांनी केलेल्या भाषणातून मागण्या मांडल्या. यावेळी डॉ बी एस पाटील यांनी मंत्री अनिल पाटील यांच्यावर जोरदार शब्दात ताशेरे ओढले. गेल्या दोन वर्षापासून नगराध्यक्ष व नगरसेवक नसल्याने प्रशासक म्हणून मुख्याधिकारी यांचा मनमानी कारभार सुरु आहे. मूलभूत नागरी सुविधांचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. भुयारी गटारींच्या अर्धवट कामामुळे शहरात चांगले रस्ते नामशेष झाले आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पादचारी व वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यांची डागडुजी ही होत नाही. काही ठराविक ठिकाणी चांगल्या रस्त्यावर पुन्हा नवीन रस्ते मंजूर होत असून शहरातील इतर भागात मात्र नागरिकांना चिखल माती तुडवत जावे लागते. गल्लोगल्ली मोकाट कुत्रे आणि डुकरांची संख्या वाढली असून त्याचा बंदोबस्तासाठी काहीच उपाययोजना नाहीत. अनेक कॉलनीमध्ये नीट पाणीपुरवठा होत नसून नागरी सुविधांचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे.भुयारी गटारीचे काम लवकर संपवा,न पा चा मनमानी कारभार बंद करून जाताना अमळनेरकरांचे आशीर्वाद अधिकाऱ्यांनी घ्यावां अन्यथा पुन्हा उपोषण आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा माजी आमदार डॉ. बी.एस पाटील, यांचेसह सचिन बाळू पाटील, अनंत निकम, रणजित शिंदे, सुभाष चौधरी, रिता बाविस्कर, यांनी यावेळी बोलतांना दिला.शहरातील त्रस्त नागरिकांच्या समस्यांचे निवेदन यावेळी न.पा. प्रशासक व मुख्याधिकारी सरोदे यांना देण्यात आले. मोर्च्यात प्रा अशोक पवार, श्रीकांत अनिल पाटील, धनगर दला पाटील, शांताराम साळुंखे, प्रविण जैन, मनिषा परब,नरेंद्र चौधरी, मौलाना रियाज शेख, बन्सीलाल भागवत, बाळासाहेब पाटील, जाकिर शेख,सचिन वाघ, प्रवीण देशमुख,महेश पाटील, मयूर पाटील, दिपीका शिंदे, रामराव पवार,डॉ.संचेती,मनोहर पाटील, विमल बाफना, मुशिर शेख, हर्षल जाधव, रफिक शेख, सनी गायकवाड, सचिन वाघ, विजय गोकलानी, गिरीश शिरोडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.




