खड्ड्यांमुळे प्रवास करणे जिकरीचे झाल्याने वाहनधारक झाले त्रस्त…
अमळनेर:- सावखेडा निमगव्हाण तापी पुलावर गेल्या चार महिन्यापासून मोठमोठे खड्डे पडल्याने तापी पुलावरून प्रवास करणे धोक्याचे झालेले आहे. वेळोवेळी अधिकाऱ्यांना सूचना व फोन करून सुद्धा लक्ष न दिल्याने अपघात होत आहेत.
चोपडा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रातील तापी पुलाची बिकट परिस्थिती झाली असून पुलावर तडे व मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच तापी पुल ते निमगव्हाण बसस्टँड नुकताच नवीन काँक्रीटीकरणाचा 500 मीटर पर्यंत रस्ता झाला मात्र निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देऊन खड्डे बुजून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा अशी मागणी वाहनधारकांमधून केली जात आहे. रस्त्याचे काम भर पावसात केल्यामुळे काम मजबूत न झाल्यामुळे रस्ता उखडला आहे. या कामाची चौकशी करून रस्ता वाहतुकीसाठी दुरुस्त करून सुरळीत करण्यात यावा अशी मागणी त्रस्त ग्रामस्थ व वाहनधारकांमधून केली जात आहे.