
तात्काळ दखल घेण्याचे आदेश दिल्याने विशेष बसची केली सुविधा…
अमळनेर:- तालुक्यात एस टी चे नियोजन नसल्याने पुन्हा एकदा बस न मिळाल्याने रढावन येथील विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरे जावे लागले. मात्र मंत्री अनिल पाटील यांनी ओएसडीना तात्काळ दखल घेण्याचे आदेश दिल्याने अखेर विद्यार्थ्यांना विशेष बस देण्यात येऊन घरी पाठवण्यात आले.

सर्वपित्री अमावस्या असल्याने तालुक्यातील काही शाळांनी स्थानिक सुटी जाहीर केली होती. तर काही शाळा सुरू होत्या. परंतु एस टी महामंडळाने सुटी समजून शाळा महाविद्यालया करिता असलेल्या एस टी बसेस बंद ठेवल्या होत्या. सर्वपित्री अमावस्येला खान्देशातील लोक आपल्या पूर्वजांना नैवैद्य देत असतात. आगारीचा घास टाकण्यासाठी प्रत्येकाची धावपळ असते. विद्यार्थी देखील वेळेवर घरी जाण्यासाठी शाळा महाविद्यालयातून माघारी फिरत होते. तालुक्यातील रढावन येथील काही विद्यार्थी घरी जाण्यासाठी बसस्थानकावर पोहचले होते. बराच वेळ वाट पाहून देखील बस लागत नसल्याने अखेर विद्यार्थ्यांनी आगार व्यवस्थापकांचे कार्यालय गाठले. आमची बस केव्हा लागेल अजून लागली नाही म्हणून विचारपूस करू लागले. त्यावेळी तेथील अधिकाऱ्यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन पिटाळून लावले आणि बस लागणार नाही म्हणून सांगितले. विद्यार्थ्यांनी आम्ही घरी कसे जाऊ म्हणून विचारले तर पुन्हा त्यांना रागावून पळवून लावण्यात आले. विद्यार्थी देखील कमी नव्हते, त्यांनी तात्काळ पळत पळत मंत्री अनिल पाटील यांचे कार्यालय गाठले. त्याठिकाणी हजर असलेल्या ओएसडी अमोल पाटील यांना तक्रार केली. अमोल पाटील यांनी विद्यार्थ्यांची समस्या मंत्री अनिल पाटील यांच्या कानावर टाकली. मंत्री अनिल पाटील यांनी अमोल पाटील यांना सांगून आगार व्यवस्थापकांना फोन करून विद्यार्थ्यांना तातडीने बसची व्यवस्था करण्यास सांगितले. अमोल पाटील यांनी आगार व्यवस्थापक इम्रान खान पठाण यांना विद्यार्थ्यांना जाण्यासाठी विशेष बसची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. आनंदात मुले पुन्हा बसस्थानकावर पोहचले. तोपर्यंत त्यांची बस लागली होती. मंत्री अनिल पाटील व अधिकारी अमोल पाटील यांनी तात्काळ दखल घेऊन बसची व्यवस्था केल्याने मुलांनी आभार मानले.




