
पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल नाही, अर्जस्वीकृतीसाठी आता उरले चार दिवस…
अमळनेर:- वेबसाईट चालत नसल्याने ग्रामपंचायतींचे उमेदवारी अर्ज भरण्यास अडथळे निर्माण झाल्याने पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झालेला नाही.

अमळनेर तालुक्यातील रढावन, मुडी प्र. डां., ढेकू सिम, लोंढवे, पिंपळे बु., अमळगाव, गोवर्धन, नंदगाव, भरवस, दोधवद, मंगरूळ, सडावण बुद्रुक, शिरसाळे बुद्रुक, मठगव्हाण या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत तर मुंगसे, पिंगळवाडे, बाम्हणे, बोदर्डे, लोणसीम, लोण चारम, लोण खुर्द, नगाव खुर्द, कुऱ्हे खुर्द आदी ग्रामपंचायतींच्या सदस्यांसाठी पोट निवडणुका जाहीर झाल्या आहेत. दिनांक १६ ते २० ऑक्टोबर दरम्यान ११ ते ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचण आल्याने एकही उमेदवारी अर्ज दाखल होऊ शकलेला नाही. आता फक्त चारच दिवस उरले आहेत. त्यामुळे दाखले तयार करणे, कागदपत्रे जमवणे,बँकेत नवीन खाते उघडणे यासाठी इच्छुक उमेदवारांची तारांबळ उडत आहे.




