
विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शारदीय व्याख्यानमालेचे उद्घाटन संपन्न…
अमळनेर:- अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अध्यक्ष चालता बोलता असावा,शासन चुकल्यास खडसावून जाब विचारणारा असावा. अध्यक्षीय भाषणात मराठी शाळांचा मुद्दा आवर्जून मांडण्यासारखा आहे, असे मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रा डॉ रवींद्र शोभणे यांनी वि. दा. पिंगळे यांनी घेतलेल्या मुलाखतीत सांगितले.

शारदीय व्याख्यानमालेचे उदघाटन मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर खासदार उन्मेष पाटील,रवींद्र शोभणे,माजी आमदार स्मिता वाघ,अशोक जैन,राजेश पांडे,भरत अमलकर, मसापचे अध्यक्ष तानसेन जगताप,वि दा पिंगळे, डॉ अनिल शिंदे,अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील,डॉ अविनाश जोशी,सदाशिव बोरसे हजर होते. यावेळी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. सदर मुलाखतीत पिंगळे यांनी विचारलेल्या प्रश्नांना शोभणे यांनी मनमोकळे पणाने उत्तरे दिली. यावेळी प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी सांगितले की, “अमळनेरच्या भूमीत अध्यक्ष होणे हे माझ्या आयुष्याचे मोठे संचित वाटते. २०१८ ला अध्यक्षपदाची निवडणूक हरलो मात्र दोन पावले मागे गेल्याने चार पावले पुढे उडी मारता आली. या भूमीत सानेगुरुजींनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. आजोबा शेतात लावण्या म्हणायचे तेव्हा आजी शिव्या द्यायच्या, मात्र घरात वारकरी सांप्रदायाची परंपरा घरात होती. गावातील दोन मंदिरातील भजन ,कीर्तन व्हायचे ते मला घरात ऐकू येत होते. नकळत मी वाचनाकडे ओढला गेलो. नंतर कथा कादंबऱ्या वाचायला लागलो. मी लहानपणी भजन, देशभक्तीपर गीत सहाव्या, सातव्या वर्गापासून लिहायला लागलो. सातव्या वर्गात नाटक लिहिले ‘ वेगळे व्हायचंय मला’ , ‛विजय कधी सत्याचा’ , तेथून सुरुवात झाली ९ वी त मला ‛देव माणूस’ नाटकात काम मिळाले. नंदिनीचे स्त्री पात्र मिळाले. तो अभिनय चांगला झाला आणि लिखाणाला सुरुवात झाली.” साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तीन दिवस गुळाचा गणपती असतो अशी टीका केली जाते. या प्रश्नावर त्यांनी “अध्यक्ष चालता बोलता असावा. मी लोकांत वावरणारा लेखक आहे. लिहिता अध्यक्ष असावा. लिखाणातून प्रश्न मांडणारा अध्यक्ष असावा आणि शासन चुकत असेल तर हे खडसावून सांगणारा असावा. मराठी शाळांवर शासनाचा अक्षम्य अन्याय आहे. पालकांची मानसिकता देखील बदललेली पाहिजे. मराठी शाळा वाचल्या पाहिजेत. प्रसंगी मी मंत्रालयात जाईल आणि शाळांबाबत भूमिका मांडणार. मी लेखकांना भेटणार आणि समाधान देणार असल्याचे सांगितले. तसेच मराठी माध्यमाच्या शाळांचा विषय हा माझा महत्वाचा विषय आहे. मराठी भाषेबाबत शासनाचे प्रेम पुतना मावशी सारखे नसावे. मराठी भाषा वाचली पाहिजे यासाठी ठोस उपक्रम शासनाकडून राबवले पाहिजेत. मराठी साहित्याचे दालन साहित्यिकांनी उघडले आहे. मराठी शाळा महाविद्यालयात प्राध्यापक आणि शिक्षकांची नियुक्ती होत नाही हे चुकीचे धोरण आहे, असे सांगत विविध प्रश्नावर आपले मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी वाङमय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी यांनी तर सूत्रसंचालन शरद सोनवणे व स्नेहा एकतारे यांनी केले.




