चक्क एकमेकांना संपविण्याची भाषा, पोलीस विभागाने गंभीर दखल घेण्याची गरज…
अमळनेर:- सकाळची 9 वाजेची वेळ, खाजगी कोचिंगसाठी विद्यार्थी जमत असताना विद्यार्थ्यांचाच एक मोठा गट अचानक धावत येत दुसऱ्या उभ्या असलेल्या गटावर जोरदार हल्ला करतो, कुणाच्या हातात दगड तर कुणाच्या हातात बरेच काही, अचानक हाणामारी सुरू झाल्याने हा भयंकर प्रकार पाहून त्या परिसरातील लोक सैरावैरा पळू लागतात. प्रचंड मोठ्या गर्दीमुळे दंगल झाली की काय?असेच चित्र निर्माण होते,असा सिनेस्टाईल हाणामारीचा भयंकर प्रकार अमळनेर शहरात न्यू प्लॉट भागात काल रोजी घडला असून यामुळे या भागात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.
मराठी वाड्मय मंडळाच्या नांदेडकर सभागृहाच्या गल्लीत हा प्रकार घडला असून हाणामारीच्या शेवटी दातमीठ्या खाऊन चक्क एकमेकांना संपविण्याची भाषा झाल्याने केव्हा काहीही विपरीत घडू शकण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी याची गंभीर दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रेम प्रकरण किंवा टोळीयुद्ध यातून ही हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत असून सिनेमाच्या स्टोरीला देखील मागे टाकेलं इतका भयंकर हा प्रकार असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. खरे पाहता या गल्लीत असले छोटे मोठे वाद कायमचेच झाले असून याचे प्रमुख कारण म्हणजे याठिकाणी असलेले अनेक कोचिंग क्लास आहेत. या कोचिंगच्या निमित्ताने दिवसभर या गल्लीत लहान पासून मोठ्या मुलांचा घोळका कायमस्वरूपी उभा असतो,लहान मुलांचा कोणताही वाद नाही मात्र मोठ्या मुलांमध्ये नेहमीच वाद होत असल्याने लहान मुले थोडे घाबरुनच राहत असतात.विशेष करून या भांडणाच्या त्रासाला या गल्लीतील रहिवासी प्रचंड कंटाळले असून काही टारगट विद्यार्थी रहिवाश्यांना दमदाटी देखील करू लागली असल्याची येथील लोकांची तक्रार आहे. यासंदर्भात क्लास चालकाकडे तक्रारी करून देखील काही उपयोग होत नसून याउलट दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे.
काल झालेला मोठा राडा पाहता परिसरातील लोक प्रचंड भयभीत झाले आहेत.सदर राड्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस लागलीच ताफा घेऊन दाखल झाले मात्र तोपर्यंत दोन्ही गटाची मुले पसार झाली होती,पोलिसांना इतरांकडून मुलांची नावे मिळाली असून पोलीस पुढे काय कारवाई करतात ते महत्वाचे आहे. पोलिसांनी मात्र दखल न घेतल्यास पुढे भयंकर पडसाद उमटतील असे बोलले जात असून पोलिसांनी क्लास चालक आणि संबंधित घरमालक यांना बोलावून काहीतरी निर्बंध लावावेत अशी मागणी न्यू प्लॉट परिसर विकास मंचतर्फे करण्यात आली आहे.