
अमळनेर:- इस्रोचे चेअरमन डॉ एस सोमनाथ यांच्या हस्ते फिरत्या प्रयोगशाळेचे उद्घाटन रामेश्वरम येथे करण्यात आले. इस्रोचे चेअरमन डॉ सोमनाथ यांनी या प्रकल्पाबाबत माहिती घेऊन राष्ट्रीय पातळीवर या प्रकल्पाचे उदघाटन केले. अमळनेर येथील मारवड परिसर विकास मंच व मिल के चलो आणि डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या संयुक्त विद्यमाने सदरचा प्रकल्प भारतभर दुर्गम भागातील शाळांसाठी राबविण्यात येईल. हि एक फिरती प्रयोगशाळा असून विज्ञानासोबत रोबोटिक्स आणि व्यक्तिमत्व विकास या वर सदरची प्रयोगशाळा अतिशय महत्वाचे कार्य पार पाडत डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नपूर्तीसाठी कामगिरी पार पाडेल.

आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे, मारवड परिसर विकास मंचचे पदाधिकारी, मिल के चलो अमळनेरचे संस्थापक अध्यक्ष अनिरुद्ध पाटील व त्यांची टीम आणि डॉ एपीजे अब्दुल कलाम फाऊंडेशनच्या परिश्रमातून हे कार्य पार पडले आहे. अब्दुल कलाम फाऊंदेशच्या राज्य समन्वयक मनीषा चौधरी यांच्या प्रयत्नातूनअब्दुल कलाम फाऊंडेशन सोबत या प्रकल्पाची नाळ जुळण्यास मोलाची मदत झाली आहे. सदर फिरती प्रयोगशाळा दिनांक १५ ऑक्टोबर रोजी इस्त्रोचे चेअरमन डॉ सोमनाथ, एपीजेएमजे शेख सलीम (कलाम सर यांचे नातू) आणि डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे को फाऊंडर) आणि इतर कलाम कुटुंबीयांच्या उपस्थितीत देशाला समर्पित केली. यावेळी मारवड विकास मंचचे प्रतिनिधी देवेंद्र साळुंखे, आशिष चौधरी, सतीश गुरव यावेळी उपस्थित होते.




